14 श्री सदस्य मृत्यू: ‘तो अधिकारी स्वच्छ आणि प्रामाणिक, पण बॉससमोर…’ पवार असं का म्हणाले?

मुंबई तक

• 04:36 PM • 21 Apr 2023

14 श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणी जी शिंदे सरकारने एकसदस्यीय समिती नेमली त्याबाबत शरद पवार यांनी गंभीर सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे.

Sharad Pawar resignation rejected praful patel tell media

Sharad Pawar resignation rejected praful patel tell media

follow google news

मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथे 16 एप्रिल रोजी जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) सोहळा पार पडला त्यात तब्बल 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणी विरोधकांनी सरकारविरोधात बरेच आरोप करणं सुरू केलं आहे. ज्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नेमली आहे. पण त्याचविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. (sharad pawar criticized shinde government on one member committee in the death of 14 shree sevak)

हे वाचलं का?

‘श्री सदस्यांच्या चौकशीसाठी जो अधिकारी नेमला आहे तो अधिकारी स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. शेवटी तो सरकारी अधिकारी आहे. सरकारी अधिकारी आपल्या बॉससमोर… तो कितीही प्रामाणिक असला, तरी सत्यस्थिती पुढे येऊ शकणार नाही.’ असं म्हणत शरद पवार यांनी शिंदेंनी नेमलेल्या एकसदस्यीय समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी काय म्हणाले शरद पवार?

मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात शरद पवार बोलत होते. “मी जितेंद्र आव्हाडांचं भाषण ऐकत होतो. काय घडलं खारघरला? खारघरला घडलं, त्यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याचा जयंतरावांनी उल्लेख केला. महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम राज्य सरकारचा कार्यक्रम आहे. राज्य सरकारचा कार्यक्रम असतो, त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची निमंत्रितांची ही जबाबदारी शंभर टक्के राज्य सरकारवर असते”, असं म्हणत शरद पवारांनी खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेला शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरलं.

हे ही वाचा>> सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचीच केली कोंडी; पत्रात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख

शरद पवारांनी पद्म पुरस्काराची आठवण यावेळी सांगितली. ते म्हणाले, “मला आठवतं की एकदा मला केंद्र सरकारने पद्म विभूषण दिलं. पद्म विभूषण घेण्यासाठी जावं कुठं लागलं, तर राष्ट्रपती भवनला. आयोजित कुणी केलं केंद्र सरकारने. हजर लोक किती होते, माझ्या कुटुंबीयांच्या वतीने मित्रांच्या वतीने एकूण 10 लोक. यापेक्षा कुणाला परवानगी नाही. त्याचं महत्त्वाचं कारण हा कार्यक्रम सरकारी होता. केंद्र सरकारचा होता. महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम सुद्धा धर्माधिकारींच्या सन्मानार्थ होता. हा कार्यक्रम धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेनं आयोजित केलेला नव्हता, तो महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेला होता”, असं शरद पवार म्हणाले.

“त्याठिकाणी… मला नक्की आकडा माहिती नाही. कुणी 10 लोक म्हणत आहेत. कुणी 15 लोक, कुणी 24 लोक म्हणताहेत. काय असेल तो असेल आकडा, पण लोक मृत्युमुखी पडले. केवळ राज्य सरकारने खबरदारी घ्यायची होती, ती खबरदारी घेतली नाही. प्रचंड उन्हाळा, उष्माघाताची शक्यता आणि असं असताना सुद्धा हा कार्यक्रम उघड्यावर घेतला जातो”, असा घणाघाती हल्ला शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

“आज तुम्ही पक्षाचं शिबीर उन्हाळ्यात घेतलं, पण तुम्ही चांगली व्यवस्था केली. उत्तम प्रकारचा मंडप टाकला. वाईट प्रसंग येणार नाही याची काळजी घेतली. पण, हा एखादा पक्ष करू शकतो आणि राज्य सरकार करू शकत नाही. याचा अर्थ एकच होता की, त्यांना प्रचंड शक्ती त्याठिकाणी जमवून त्यामधून एक प्रकारचं राजकारणाला अनुकूल वातावरण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात करायचं होतं. त्यामध्ये अशा प्रकारचा निष्काळजीपणा दाखवला गेला. त्याची किंमत काही निष्पाप लोकांना द्यावी लागली. याची चौकशी झाली पाहिजे”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

हे ही वाचा>> अजित पवारांमुळे बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना आता ‘दादा’च हवेत!

“जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की, याची चौकशी निवृत्त न्यायाधिशांमार्फत झाली पाहिजे. जयंतरावांनी सांगितलं की उच्च न्यायालयातील आताच्या न्यायमूर्तीमार्फत झाली पाहिजे. या प्रकारचं गांभीर्य राजकारण्याचं आहे. अधिकाऱ्यांची चौकशी नेमणूक केली. तो अधिकारी स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. शेवटी तो सरकारी अधिकारी आहे. सरकारी अधिकारी आपल्या बॉससमोर… तो कितीही प्रामाणिक असला, तरी सत्यस्थिती पुढे येऊ शकणार नाही. त्यासाठी उच्च न्यायालयातील सध्याच्या न्यायमूर्तींकडेच हे काम सोपवलं पाहिजे आणि वस्तुस्थिती ही देशासमोर आणली पाहिजे”, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतरच्या दुर्दैवी घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती

खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा>> महाराष्ट्रात राजकारण पेटलं, 12 श्री सदस्यांच्या मृत्यूवर अखेर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सोडलं मौन

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल. असं CMO कडून जाहीर करण्यात आलं आहे.

    follow whatsapp