Baramati: शिंदे-फडणवीसांनी पवारांचं निमंत्रण नाकारलं, पण अजितदादा...

ऋत्विक भालेकर

• 03:56 PM • 01 Mar 2024

Sharad Pawar invitation: मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे 2 मार्च रोजी एका कार्यक्रमानिमित्त बारामतीत येणार आहेत. याचेच औचित्य साधून शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. त्यापैकी शिंदे आणि फडणवीस यांनी या निमंत्रणास मात्र नकार दिला आहे.

शिंदे-फडणवीसांकडून पवारांच्या निमंत्रणाला नकार

शिंदे-फडणवीसांकडून पवारांच्या निमंत्रणाला नकार

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांकडून CM-DCM यांना स्नेहभोजनाचं आमंत्रण

point

शिंदे-फडणवीसांनी दिला निमंत्रणाला नकार

point

अजित पवारांकडून अद्याप स्पष्टता नाही

Eknath Shinde and Devendra Fadnavis rejected Sharad Pawar's invitation: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना बारामतीत आपल्या खासगी निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रित केलं होतं. बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने हे तीनही नेते उद्या (2 मार्च) बारामतीत येणार आहे. त्याचच निमित्त साधून शरद पवारांनी या तीनही नेत्यांना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र, आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आमंत्रणाला नकार दिला आहे. पण अद्याप अजित पवारांची भूमिका काही स्पष्ट झालेली नाही. (sharad pawar had invited chief minister eknath shinde and both deputy chief minister devendra fadnavis and ajit pawar for lunch in baramati among them shinde and fadnavis have rejected this invitation)

हे वाचलं का?

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी जेवणाचं निमंत्रण देत एक वेगळी राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न यावेळी केला. पण शिंदे-फडणवीसांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमाचं कारण देत भोजनाच्या निमंत्रणास नकार दिला आहे. याबाबत त्यांनी पवारांना पत्र देत न येण्याचं कारणही त्यात नमूद केलं आहे. 
 
दुसरीकडे अजित पवार यांना देखील उपमुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. पण अजित पवारांच्या बाजूने याबाबत अद्याप तरी स्पष्टता देण्यात आलेली नाही. एकीकडे शिंदे-फडणवीसांनी पत्र देत येणार नसल्याचं सांगितलं असलं तरी अजित पवारांनी मात्र, याबाबत काहीही स्पष्टता दिलेली नाही. 

शरद पवारांच्या निमंत्रणाला मुख्यमंत्र्यांचा नकार, वाचा ते पत्र जसंच्या तसं.. 

एकनाथ संभाजी शिंदे 
मुख्यमंत्री

आपले २८ फेब्रुवारी २०२४ रोजीचे पत्र मिळाले. आपण आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. परंतु पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी आपल्याकडे इच्छा असुनही यावेळी येऊ शकणार नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

तरी भविष्यात नक्कीच आपल्याकडे भोजनाचा योग येईल असे मला वाटते. पुन्हा एकदा निमंत्रणाबद्दल
धन्यवाद !!

एकनाथ शिंदे

प्रति,
मा.श्री. शरदचंद्रजी पवार,
राज्यसभा सदस्य.

 

देवेंद्र फडणवीसांनीही कळवला नकार, वाचा पत्रात नेमकं काय म्हटलंय.. 

उप मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य

मा. शरद पवारजी
सस्नेह नमस्कार,

आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.

आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही.

पुनश्चः एकदा आपले आभार.

आपला
(देवेंद्र फडणवीस)

शरद पवारांची नवी खेळी काय असणार? 

नमो महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री हे प्रमुख अतिथी आहेत. मात्र, या कार्यक्रमासाठी शरद पवारांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे पवारांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलं होतं त्यात या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. यासोबतच त्यांनी कार्यक्रमानंतर भोजनासाठीही मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं होतं. मात्र, आता दोन्ही नेत्यांनी आमंत्रण नाकारल्याने शरद पवार पुढचा कोणता डाव टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

    follow whatsapp