Devendra Fadnavis: मुंबई: 'जरांगे बामणी कावा.. वैगरे म्हणतात ते त्यांचं वक्तव्य सोडून द्या.. ते नवीन आहेत.. पण जे राजकारणात वरिष्ठ आहेत. ती लोकं पण अशीच वागतात. शरद पवारांसारखा माणूसही माझ्या जातीवर जातात...' असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे हे मागील काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. यावरच बोलताना फडणवीसांनी थेट शरद पवारांनाच टार्गेट केलं आहे. (sharad pawar himself talks about my caste devendra fadnavis expressed his anger)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस हे टीव्ही 9 मराठीच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते. तेव्हा त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
शरद पवारांबाबत फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे हे बामनी कावा म्हणाले. तसंच अनेक गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केले. असा प्रश्न जेव्हा फडणवीसांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, 'त्यावर जरांगे हे स्वतः बोलले आहेत. ते म्हणाले की, ते खूप दिवसांपासून उपोषण करत होते. आणि त्यामुळे त्यांचा बोलताना ताबा सुटला. पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, तुम्ही पण जरांगेंचं वक्तव्य सोडून द्या, त्यांना जाऊ द्या. मनोज जरांगे हे तर नवीन आहेत. पण, राजकारणातले वरिष्ठ लोकही असं वागतात.
हे ही वाचा>> पवारांचं निमंत्रण शिंदे-फडणवीसांनी नाकारलं, पण अजितदादा
'शरद पवारांसारखा माणूससुद्धा जातीवर येतो. आम्ही जेव्हा कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेचं तिकीट दिलेले तेव्हा शरद पवार काय म्हणालेले ते आठवा. शरद पवार म्हणालेले की, 'पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे आणि आता पेशवे छत्रपती नेमायला लागलेत.' म्हणून मला जरांगेंच्या वक्तव्याचं काही वाटत नाही.'
'एखाद्या व्यक्तीविरोधात बोलायला काही नसेल तेव्हा अशी विधानं केली जातात. जेव्हा त्यांना माझ्याबद्दल बोलायला काही गोष्टी नसतात, किंवा माझ्यावर भ्रष्टाचाराचे तसंच राजकीय आरोप त्यांना करता येत नाहीत, तेव्हा ते जातीवरून आरोप लावतात.' असं म्हणत फडणवीसांनी पवार जातीभेद करत असल्याचा आरोप यावेळी केला.
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा असंही म्हटलं की, जरांगे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची स्क्रिप्ट वाचत आहेत. ज्या पद्धतीने पवार आणि ठाकरे आधी बोलत होते त्याच प्रकारे जरांगे हे बोलत आहेत. असं फडणवीस यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> 'आधी तयारी करून...', घोसाळकरांची हत्या, फडणवीसांनी सांगितली सगळी कहाणी
फडणवीसांच्या या सगळ्या आरोपांना शरद पवार नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT