Ravindra Waikar, Yamini Jadhav : दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईमधून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर हे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (What is current status of ravindra waikar and yamini jadhav corruption cases)
ADVERTISEMENT
जाधव असो, वा वायकर... या दोघांवर किरीट सोमय्यांसह भाजप नेत्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. पण, आता त्यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी भाजपच्या वॉशिंग मशिनचा उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे.
त्याचबरोबर जाधव, वायकर यांचे स्टार प्रचारक किरीट सोमय्या यांना करावं अशी थेट उपरोधक मागणीच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे.
यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्यावरील आरोपांची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांच्यावर नेमके कुठले आरोप होते, त्यांचं पुढे काय झालं?
यामिनी जाधवांचं प्रकरण काय आहे?
यामिनी जाधव, शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूक प्रतिक्षापत्रात दाखल केलेल्या काही माहितीवर आयकर विभागाने संशय व्यक्त केला होता. कर्ज प्रकरणातील अनियमिततेवर बोट ठेवत आयकर विभागाने मनी लॉंडरिंगचा मुद्दा देखील उपस्थित केला होता, त्याचबरोबर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची देखील शिफारस आयकर विभागाकडून करण्यात आली होती.
हेही वाचा >> महाराष्ट्रातील 9 खासदारांना झटका, तिकिटं का कापली?
कलकत्त्यातील एक शेल कंपनी आणि यामिनी जाधव यांचे पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये व्यवहार झाल्याचं समोर आलं होतं. जाधव यांचे पती आणि कुटुंबातील इतर लोकांनी अवैधपणे पैसे पुरवल्याचं तपासात आढळून आल्याचं आयकर विभागाने म्हटलं होतं.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नियामाप्रमाणे प्रतिज्ञापत्राची पडताळणी करण्यास सांगितल्यानंतर आयकर विभागाच्या पाहणीत या बाबी समोर आल्या होत्या. यशवंत जाधव व त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि इतरांना आवास असुरक्षित कर्जाच्या स्वरुपात १५ कोटी रुपये दिले गेले असल्याचं आयकर विभागाला आढळून आलं होतं.
ठाकरेंची साथ सोडून यामिनी जाधव शिंदेंच्या शिवसेनेत
हे सगळं प्रकरण गाजत असताना शिवसेनेत बंड झालं. यामिनी जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयकर विभागाने केलेल्या शिफारशीवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्याचबरोबर यामिनी जाधव यांच्यावरील कारवाई देखील पुढे कोल्ड स्टोरेजमध्ये गेली म्हणजेच थंड बस्त्यात गेली.
रवींद्र वायकर यांचं प्रकरण काय?
रवींद्र वायकर यांचं प्रकरण नुकतंच समोर आलं होतं. मुंबईतील जोगेश्वरी भागात १३ हजार ६७४ चौरस फुटांचा भूखंड हा मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. हा भूखंड मैदान आणि रुग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता.
या भूखंडाची बाजारभावानुसार किंमत ५०० कोटींच्या घरात आहे आणि या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी ५ स्टार हॉटेल बांधल्याचा आरोप करण्यात आला. या बांधकामासाठी वायकर यांनी महापालिकेची कुठलीही परवानगी घेतली नव्हती, असा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
हेही वाचा >> "शरद पवार अस्वस्थ झाले असते, तर ८४ वर्ष जगले नसते", राणेंचं विधान
या प्रकरणात ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड देखील टाकण्यात आली होती. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. ईडीची कारवाई सुरु असताना देखील वायकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते.
वायकर यांच्या प्रकरणाचे पुढे काय झाले?
वायकर यांच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या चर्चा सुरु होताच मुंबई महानगरपालिकेकडून वायकर यांच्या विरोधातील याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वायकरांना मोठा दिलासा मिळाला.
मुंबई महानगरपालिकेने वायकर यांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करणार असल्याचं देखील न्यायालयात सांगितलं. त्यामुळे प्रकरण निकाली निघालं. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने माघार घेताच काहीच दिवसात रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
हेही वाचा >> शरद पवारांची अभिजीत पाटलांनी सोडली साथ, माढ्यात किती धोका?
आता यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांना लक्ष्य केलं जात आहे. सोमय्यांना प्रचारप्रमुख करा, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी लगावला. त्यानंतर त्यांना प्रचार करणार का? असं विचारण्यात आले. त्यावेळी ते काय म्हणाले...
"मोदींसाठी आम्ही प्रत्येक मतदाराकडून मत मागणार आहोत. यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांचा प्रचार करणार का? असे प्रश्न तुम्ही मला विचारत असता, पण हेच प्रश्न तुम्ही उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांना विचारण्याची हिंमत दाखवा. नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणे, भारताला पहिल्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनविणे याला मी आयुष्यात कधीच तडजोड म्हणणार नाही. ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. आपला देश आणि सर्व मतदार हे सध्या पंतप्रधान निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदाराकडून आम्ही मोदींसाठी आणि त्यांच्या कामांसाठी मत मागणार आहोत. नकली सेनेच्या नेत्याला तीन महिन्यासाठी पंतप्रधान व्हायचे असेल तर आम्ही समझोता करूच शकत नाही."
जाधव आणि वायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून देखील भाजवर टीका करण्यात येत आहे. हाच मुद्दा प्रचारात गाजणार असंच दिसत आहे.
ADVERTISEMENT