Supriya Sule Ajit Pawar Baramati Lok sabha 2024 Election : अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांकडून थेट सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलं जात आहे. अजित पवारांनी सेल्फी आणि भाषणावरून सुप्रिया सुळेंवर टीका केली. त्यावरून सुळेंनी खडे बोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
अजित पवार बारामतीत बोलताना म्हणाले होते की, 'संसदेत भाषणं करून कामं होतं नाही. सेल्फी काढणं म्हणजे विकास नाही.' याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "तो त्यांचा विषय आहे. हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारावा लागेल. आणि दोन गोष्टी तुम्हाला आर्वजून सांगते. सेल्फीचा विषय तुम्ही काढला. चांगलं केलं. खरंतर पंतप्रधानांनी एक ऑर्डर काढली आहे. ती ऑर्डर मी संसदेत वाचून दाखवली आहे."
"मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक जीआर देशासाठी काढला होता की, प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा. अशी एक बातमी आली होती की, स्मृती इराणींना पंतप्रधानांनी असं सांगितलं होतं की, देशातील एक कोटी महिलांबरोबर सेल्फी काढा. स्टेशनपासून, कॉलेजपासून सगळीकडे मोदीजींचे सेल्फी पॉईंट्स लावा", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"सेल्फी काढायला मोदींनी सांगितलं"
"भाजपचे सहकारी मला विमानात भेटले. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजला पुस्तकांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. राजेश पांडेंजी भेटले. त्या पुस्तक प्रदर्शनातही तीन सेल्फी पॉईंट होते. एक मोदीजींचा. एक पहिल्या उपमुख्यमंत्र्यांचा, एक दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा आणि एक मुख्यमंत्र्यांचा. असे चार सेल्फी पॉईंट होते. दिल्ली विमानतळावर प्रवेश करतो, तिथेही मोदीजींचा सेल्फी पाईंट आहे. त्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाही. या देशाचे पंतप्रधान करत आहेत. पंतप्रधान जरी वेगळ्या विचारात काम करत असले, तरी ते देशाचे पंतप्रधान आहे. देशाचे पंतप्रधानच आम्हा खासदारांना सांगतात की, जावा सेल्फी काढा. पंतप्रधान म्हणून आम्ही त्यांच्या विचारांचा आम्ही मान सन्मान करतो", असे सांगत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर पलटवार केला.
भाषणाचा मुद्दा... सुप्रिया सुळे अजित पवारांना काय म्हणाल्या?
संसदेत भाषण करण्याच्या मुद्द्यावरूनही सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना सुनावलं. त्या म्हणाल्या, "संसद ही आमच्यासाठी एक इमारत नाही, तो एक विचार आहे. या देशात ज्याला आपण लोकशाही म्हणतो, तिचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा मोदीजी पहिल्यांदा निवडून आले, तेव्हा संसद भवनात नतमस्तक झाले. त्यामुळे संसदेत जी चर्चा होते, त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो."
"लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला. संसदेत तुम्ही आम्हाला निवडून कशासाठी देता की, आम्ही तिकडे जावं, भाषण करावं. भाषण करण्यासाठीच तर संसद असते. यालाच तर लोकशाही म्हणतात. मला सार्थ अभिमान आहे की, ज्या वास्तूमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान लिहिलं. पंडित नेहरूंनी त्याच वास्तूमधून देशाला संबोधित केलं. त्यानंतर वाजपेयी, त्यानंतर प्रणब मुखर्जी, त्यांनंतर सुषमा स्वराज, त्यानंतर गोपीनाथ मुंडे... किती नेत्यांची मी नावे घेऊन सांगू?", असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.
"धोरण संसदेत मान्य झाल्याशिवाय पुढे जातच नाही. त्यामुळे जो काही निधी... विकास होतो, त्या विकासाची सुरूवात त्याच संसदेतून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे जातात. आता आरक्षणाचा विषय आहे. आरक्षणाचा विषय आता कुठे येणार? तो संसदेत मान्य झाल्याशिवाय येणार नाही ना? तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना", असा उपरोधिक टोला सुळेंनी अजित पवारांना लगावला.
"भाषण करण्यासाठी आदर्श... म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आदर्श ज्यांची भाषणं वाचून आम्ही आज संसदेत भाषण करतो, म्हणजे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शन कैलासवासी यशवंतराव चव्हाण. मधू दंडवते. त्यांचे संदर्भ आम्ही आजही संसदेत घेतो. हे मोठे नेते होऊ गेले. त्यांच्या भाषणाचा परिणाम आजही आहे. चंद्रशेखरजी जेव्हा संसदेत उभे राहायचे, तेव्हा सगळे शांत राहायचे. आजही आम्ही सगळे भाषण करतो", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"गंमत म्हणून भाषणाचं उदाहरण देते. गेल्या आठवड्यात सत्ताधारी बाकावरून श्वेतपत्रिकेवर आदर्श भाषण केलं. श्वेतपत्रिकेवर त्यांनी आदर्शवर भाषण केलं आणि काही प्रवेश झाले. म्हणजे संसदेत केवढी ताकद आहे बघा. प्रवेश घ्यायला उपयोगी पडतं. आरोप करायला उपयोगी पडतं. विकास करायलाही... किती गोष्टी या लोकशाहीच्या मंदिरात होतात. भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे? ही लोकशाही आहे दडपशाही नाही", असं उत्तर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना दिलं.
ADVERTISEMENT