Yugendra Pawar News : (वसंत पवार, बारामती) अजित पवारांनी बंड केल्यापासून बारामती आणि पवार कुटुंब सातत्याने चर्चेत आहे. काका-पुतण्यातील (शरद पवार विरुद्ध अजित पवार)संघर्ष शिगेला गेलेला असतानाच आता आणखी एका पुतण्याची एन्ट्री झालीये. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपूत्र असलेल्या युगेंद्र यांच्या नावाची आता विधानसभा निवडणुकीसाठीही चर्चा सुरू झाली आहे. (who is yugendra pawar?)
ADVERTISEMENT
"माझं कुटुंब सोडलं तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटं पाडण्यासाठी कसे काहीजण जीवचं रान करतात ते बघा', असं अजित पवारांनी बारामतील एका कार्यक्रमात म्हटलं. त्याला काही दिवस लोटत नाही, तोच युगेंद्र पवारांच्या एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
युगेंद्र पवारांनी बारामतीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली आणि त्यामुळेच युगेंद्र पवारांबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या एन्ट्रीचे अर्थ समजून घेण्याआधी युगेंद्र पवार कोण आहेत, ते समजून घ्या.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार फारसे चर्चेत नसले, तरी ते अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याशी जोडले गेलेले आहेत. परदेशात उच्च शिक्षण घेतलेले युगेंद्र पवार यांना शरद पवारांनीच विद्या प्रतिष्ठाणच्या कामात सहभागी करून घेतलं.
युगेंद्र पवार हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार, बारामतीच्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, शरयू उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते जलसंधारण, ओढा खोलीकरण, पर्यावरण समृद्ध राहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात सीडबॉल निर्मितीच्या उपक्रमात काम करतात. अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना विहिरी खोदून दिल्या आहेत.
हेही वाचा >> ऐन निवडणुकीत शिंदे सरकारला अडचणीत आणणार, जरांगेंचा पुढचा प्लॅन काय?
युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र, जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, तेव्हा बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गटाला कार्यकर्ते आहेत की नाही असा सवाल उपस्थित झाला. त्याचवेळी पहिल्यांदा त्यांनी बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्त्यांचे आयोजित करून शरद पवार यांना निमंत्रित केले होते.
त्यांच्या या कृतीची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा युगेंद्र पवार हे थेट आपले चुलते अजित पवार यांना विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटून त्यांना पाठबळ देणार आहेत.
सुप्रिया सुळेंचा करणार प्रचार?
'मी कोणाचा विरोध करायचा नाही म्हणून नव्हे तर शरद पवार साहेबांना साथ देण्यासाठी आलो आहे. मी बारामतीमध्ये साहेब सांगतील त्या उमेदवारासाठी प्रचार करेन', असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बारामतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे युगेंद्रने माझा प्रचार केला, तर मला आनंदच आहे, असं सुप्रिया सुळेही म्हणाल्या आहेत. त्यामुळे युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळेंसाठी प्रचारात उतरणार असंच दिसतंय.
हेही वाचा >> 'सरसकट आरक्षण 1 मिनिट देखील टिकणार नाही', माजी न्यायमूर्ती दिलीप भोसलेंचं मुंबई Tak चावडीवर मोठं विधान
महत्त्वाचं म्हणजे युगेंद्र पवार फाऊंडेशनच्या सोशल मीडिया पेजवरुनही युगेंद्र पवार हे शरद पवारांची ताकद वाढवणार, अशा पोस्ट करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे युगेंद्र पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधातील उमेदवार असतील, अशी ही चर्चा सध्या बारामती मध्ये सुरू आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा एक काका-पुतण्या संघर्ष बघायला मिळू शकतो.
ADVERTISEMENT