पुणे : देशाला पहिलं ऑलिम्पिक मेडल महाराष्ट्राने जिंकून दिलं होतं, पण त्या खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रात ऑलिम्पिक मेडल जिंकणारा खेळाडू तयार झालेला नाही, अशी खंत अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी व्यक्त केली. ते पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
ADVERTISEMENT
ब्रिजभूषण सिंह पुढे म्हणाले, खाशाबा जाधव यांच्यानंतर कुस्तीत ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ पडला होता. २००८ साली तो दुष्काळ सुशिल कुमारने संपवला. त्यानंतर आजपर्यंत आपण ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत सलग मेडल्स जिंकत आहोत. पण गेल्या ६१ वर्षांपासून यात महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिक मेडल घेऊन आला नाही हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, महाराष्ट्राचं सरकारने मिशन ऑलिम्पिकची सुरुवात करावी. राज्यातील खेळाडूंना मदत करावी. महाराष्ट्राचा ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ संपावा.
ब्रिजभूषण सिंह यांच्या या विनंतीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडला.
-
राज्यात मिशन ऑलिम्पिकची सुरुवात करणार. खेळाडूंना मदत करणार.
-
राज्यात ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळणाऱ्यांना फक्त ६ हजार रुपये मानधन दिलं जातं. ते मानधन वाढवून २० हजार रुपये करण्याचा निर्णय.
-
हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद यांना ४ हजार रुपये मानधन दिलं जातं. ते १५ आता हजार रुपये देण्याचा निर्णय.
-
अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडुंना ६ हजार रुपये मानधान दिले जाते. त्यांना आता २० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय.
-
वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार रुपये मानधन दिलं जातं. ते तीनपट वाढवून म्हणजेच साडे सात हजार रुपये देण्याचा निर्णय.
-
महिलांसाठी ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करणार.
फडणवीस पुढे म्हणाले, या निर्णयांमागे भावना हीच आहे की आमचे खेळाडू मेहनत करतात. कुस्तीत मेहनत आणि खुराकही लागतो. या दोन्हीसाठी मोठा खर्चही येतो. सामान्य घरचे लोकं खूप मेहनतीने पैलवान, कुस्तीगीर तयार होतात. त्यामुळे त्यांना काही ना काही सरकारकडून मदत मिळायला हवी. त्यासाठी मानधनवाढीचा निर्णय घेतला आहे. मागील काळात ३ खेळाडूंना आपण डीवायएसपी म्हणून नोकरी दिली होती. अशी संधी खेळाडूंना देण्याचं काम निश्चितपणे करु. तसंच महिलांसाठी ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन नक्की करू. महाराष्ट्र सरकार त्यासाठीही मदत नक्की करु असंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT