आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला पुन्हा एकदा वादाची किनार लागली आहे. शुक्रवारी दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये वादग्रस्त नो-बॉल वरुन झालेला राडा दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला चांगलाच भोवला आहे. पंचांनी नो बॉल न दिल्यामुळे बेशिस्त वर्तन करत खेळाडूला परत बोलावणाऱ्या पंतचं 100 टक्के मानधन कापून घेण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
याव्यतिरीक्त पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत सामना सुरु असताना मैदानात येऊन हुज्जत घालणाऱ्या दिल्लीचे प्रशिक्षक प्रवीण अमरेंवर एक सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तसेच शार्दुल ठाकूरच्या मानधनातली 50 टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. या राड्याचे पडसाद नंतर सोशल मीडियावर उमटताना दिसले ज्यात अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट फॅन्सनी पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर टीका केली आहे.
राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा बॅटींग करताना जोस बटलरच्या तिसऱ्या शतकी खेळीच्या जोरावर 222 धावांचा टप्पा गाठला. याला उत्तर देताना दिल्लीच्या संघानेही चांगली झुंज दिली. अखेरच्या ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी 36 धावांची गरज असताना राजस्थान रॉयल्सच्या ओबेड मकॉयच्या बॉलिंगवर वेस्ट इंडिजच्या रोव्हमन पॉवेलने 3 षटकार ठोकले. यावेळी मकॉयचा तिसरा बॉल हा पॉव्हेलच्या कमरेवर असल्यामुळे दिल्लीने त्याला नो-बॉल घोषित करण्याची मागणी केली. परंतू पंचांनी तो निर्णय नाकारल्यामुळे मैदानात पुढची काही मिनीटं राडा झाला, ज्यात सामन्याचं पारडं राजस्थानच्या दिशेने झुकलं आणि 15 धावांनी संजू सॅमसनच्या संघाने बाजी मारली.
ADVERTISEMENT