श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत निर्भेळ यश संपादन केल्यानंतर भारतीय संघ आता दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारपासून या मालिकेला सुरुवात होणार असून पहिला सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मोहाली येथील मैदानावर खेळवला जाईल. हा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. विराटच्या कसोटी कारकिर्दीतला हा शंभरावा सामना असणार आहे.
ADVERTISEMENT
सुरुवातीला ही कसोटी मालिका प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवली जाणार होती. परंतू विराटची शंभरावी कसोटी बघायला मिळणार नसल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पंजाब क्रिकेट असोसिएशनने मोहाली कसोटी सामन्याला ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
मोहाली कसोटी सामना हा प्रेक्षकांविना खेळवला जाणार नाही. हा निर्णय राज्य क्रिकेट संघटनेने विविध मुद्द्यांचा विचार करुन घेतला असल्याचं जय शहा यांनी ANI शी बोलताना सांगितलं. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना विराट कोहलीच्या शंभराव्या कसोटी सामन्याचा हिस्सा होता येणार आहे. धर्मशाळा येथे झालेल्या अखेरच्या टी-२० सामन्यात प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. ज्यानंतर मोहाली टेस्टला प्रेक्षक उपस्थितीबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे चाहत्यांच्या या नाराजीचा विचार करुन बीसीसीआय आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनने आपल्या निर्णयात बदल केला आहे.
तिकीट खिडकीवर गर्दी टाळण्यासाठी पंजाब क्रिकेट असोसिएशनने कसोटी सामन्यांच्या तिकीटाची ऑनलाईन विक्री करायचं ठरवलं आहे. याचसोबत राज्य संघटना कोविडच्या सर्व नियमांचं तंतोतंत पालन करणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये विराट कोहलीला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्यामुळे आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात विराट आपला बॅडपॅच संपवून पुन्हा एकदा शतकी खेळी करतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT