FIFA World Cup : इराणच्या खेळाडूंना अटक होणार? आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून टीम कायमची आऊट?

मुंबई तक

• 09:16 AM • 22 Nov 2022

कतारमध्ये सध्या फिफा वर्ल्डकप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सोमवारी इराण आणि इंग्लंड संघ आमनेसामने होते. या सामन्यात इंग्लंडने ६-२ अशा फरकाने इराणवर मोठा विजय नोंदवला. इंग्लंडच्या विजयासोबतच हा सामना आणखी एका कारणाने चर्चेत राहिला. सोमवारी इराणच्या फुटबॉल संघानं आपल्याच देशाचं राष्ट्रगीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर म्हणण्यास भर मैदानात नकार दिला. विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या या कृतीला […]

Mumbaitak
follow google news

कतारमध्ये सध्या फिफा वर्ल्डकप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सोमवारी इराण आणि इंग्लंड संघ आमनेसामने होते. या सामन्यात इंग्लंडने ६-२ अशा फरकाने इराणवर मोठा विजय नोंदवला. इंग्लंडच्या विजयासोबतच हा सामना आणखी एका कारणाने चर्चेत राहिला. सोमवारी इराणच्या फुटबॉल संघानं आपल्याच देशाचं राष्ट्रगीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर म्हणण्यास भर मैदानात नकार दिला. विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या या कृतीला स्टेडियममधील उपस्थित इराणच्या प्रेक्षकांनीही पाठिंबा दिला.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?

इराणमध्ये सध्या हिजाबच्या विरोधात निदर्शनं सुरू झाली आहेत. इराणच्या संघाने याच महिलांच्या निदर्शनांच्या समर्थनार्थ फुटबॉलचा सामना सुरू होण्यापूर्वी आपल्या देशाचं राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. मात्र आता इराणच्या संघाची ही कृती म्हणजे सरकारच्या विरोधातील उठाव मानला जात आहे. त्यामुळे इराणमध्ये परत गेल्यानंतर या संघातील खेळाडूंना याचे गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

महसा अमिनी (वय २२) या महिलेचा काही दिवसांपूर्वी इराण पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता. ‘चुकीच्या’ पद्धचीने हिजाब परिधान केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून इराणमध्ये हिजाबच्या विरोधात निदर्शनं सुरू झाली आहेत. या निदर्शनांदरम्यान काही महिला हिजाब जाळताना आणि केस कापतानाही दिसून आल्या आहेत.

इराणच्या खेळाडूंवर काय कारवाई होऊ शकते?

शासनाविरोधात आवाज उठवल्याबद्दल खेळाडूंना कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार हे निश्चित मानलं जात आहे. इराण प्रशासनाने फुटबॉल खेळाडूंविरोधात अटक वॉरंट जारी केल्याचाही दावा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारला आव्हान दिल्याबद्दल, खेळाडूंना तुरुंगातही टाकलं जाऊ शकतं, अथवा नजरकैदेत ठेवलं जाऊ शकतं. याशिवाय फुटबॉल बोर्डही बरखास्त केलं जाऊ शकतं, त्यामुळे या संघाला भविष्यातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून प्रतिबंधित केलं जाऊ शकतं.

    follow whatsapp