IND vs ENG T20 World Cup : रोहित-सूर्याचा इंग्लडला तडाखा! भारत विजेतेपदापासून एक पाऊल दूर

मुंबई तक

28 Jun 2024 (अपडेटेड: 28 Jun 2024, 08:39 AM)

Ind vs Eng Semi Final highlights : टी20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात भारताने इंग्लडला धूळ चारली. इंग्लडचा 68 धावांनी पराभव करत भारताना टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

भारताने टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लडचा 68 धावांनी पराभव केला.

follow google news

बातम्या हायलाइट

point

टी20 विश्वचषक स्पर्धा उपांत्य सामना

point

भारताचा इंग्लडने 68 धावांनी केला पराभव

point

भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना

T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Final Highlights : आयसीसी टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दिमाखात धडक मारली. 27 जून (गुरुवार) रोजी गयानातील प्रॉव्हिडन्स स्टेडियमध्ये खेळवल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडला 68 धावांनी धूळ चारली. उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 16.4 षटकांत 103 धावांत गारद झाला. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 29 जून रोजी ब्रिजटाउन (बार्बाडोस) येथे विजेतेपदासाठी अंतिम सामना होणार आहे. (India Beats England in T20 World Cup Semi Final by 68 Runs)

हे वाचलं का?

भारतीय संघ तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी 2007 आणि 2014 च्या स्पर्धेतही टीम इंडियाने अशी कामगिरी केली होती. 

2007 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते. आता भारताला दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. भारतीय संघाने विजेतेपद पटकावल्यास 11 वर्षांचा आयसीसीच्या स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळही संपुष्टात येईल. 

भारतीय संघाने 2013 मध्ये शेवटचे आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

इंग्लडच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या

उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज भारतीय फिरकीपटूंसमोर हतबल दिसले. चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेल यांच्या शानदार गोलंदाजीने इंग्लडच्या फलंदाजांना चक्रावून टाकले.

हेही वाचा >> पवारांनी टाकला मोठा डाव, अजित पवारांच्या आमदारांशी गुपचूप भेट; नेमकं काय घडलं? 

इंग्लंडकडून केवळ हॅरी ब्रूक (25 धावा), जोस बटलर (23 धावा), जोफ्रा आर्चर (21 धावा) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (11 धावा) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. भारताकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या. तर इंग्लंडचे दोन खेळाडू धावबाद झाले.

सूर्या-रोहितने टीम इंडियाला संकटातून काढले बाहेर

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 171 धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. पॉवरप्लेमध्येच भारताने दोन गडी गमावले.

रीस टॉप्लीने आधी विराट कोहलीला (9) त्रिफळाचित केले. त्यानंतर ऋषभ पंतला (4) सॅम करनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 40 धावांत दोन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सांभाळला.

रोहित आणि सूर्यकुमार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीमुळे भारतीय संघ चांगली धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला.

हेही वाचा >> ''पंकजा मुंडेंना धोका दिला'', शिंदेंच्या नेत्याच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

रोहित शर्माने 39 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 36 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. यानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाने स्लॉग ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली. 

हार्दिक पांड्याने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 9 चेंडूंचा सामना करत नाबाद 17 धावा केल्या, ज्यात दोन चौकारांचा समावेश होता.

इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने तीन षटकांत 37 धावा देत तीन बळी घेतले. तर आदिल रशीदने 25 धावांत एक विकेट घेतली. रीस टोपले, जोफ्रा आर्चर आणि सॅम कुरन यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. 

    follow whatsapp