कानपूर येथील कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबईतील कसोटी सामन्याआधी भारताला झटका बसला आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि जलदगती गोलंदाज इशांत शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
ADVERTISEMENT
भारत आणि न्युझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुंबईत होत आहे. या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी माहिती बीसीसीआयने दिली. उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा आणि इशांत शर्मा यांना जायबंदी झाल्याने दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे न्युझीलंडलाही एक मोठा झटका बसला आहे. न्युझीलंडचा कर्णधार केन विलियनसनही दुखापत झाल्याने मुंबईतील कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे.
इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला जखम झाली आहे. कानपूर कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इशांत शर्माच्या डाव्या हाताची हाड सरकलं आहे. त्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. स्कॅन केल्यानंतर हातावर सूज आली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे त्याला आराम करण्याचा सल्ला दिला गेला असून, त्यामुळे जाडेजा दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही.
उपकर्णधार अजिंक्य रहाणेलाही पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली असून, त्याला मुंबईत होत असलेल्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या विश्रांती देण्यात आली आहे.
भारत आणि न्युझीलंड यांच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात असून, कानपूर येथील कसोटी सामना अनिर्णित ठरल्यानं भारताला मालिका जिंकण्यासाठी ही कसोटी जिंकणं महत्त्वाचं आहे. वानखेडे स्टेडिअममध्ये हा सामना खेळला जात आहे. कानपूर येथील सामन्यात भारताचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र, न्युझीलंडच्या तळाच्या गोलंदाजांना चिवट फलंदाजी करत सामना अनिर्णित केला.
ADVERTISEMENT