मोहाली कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. आपला पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताने श्रीलंकेला ४ बाद १०८ वर रोखलं आहे. श्रीलंकेचा संघ सध्या पहिल्या डावात ४६६ धावांची पिछाडीवर असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना तिसऱ्या दिवशी अथक प्रयत्न करावे लागणार असं दिसत आहे.
ADVERTISEMENT
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. कर्णधार दिमुथ करुणरत्ने आणि लहिरु थिरीमने यांनी लंकेला पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करुन दिली. आश्विनने थिरीमनेला बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने करुणरत्नेही जाडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
यानंतर अनुभवी निसंका आणि मॅथ्यूज या जोडीने छोटेखानी भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. ही जोडी मैदानावर स्थिरावते आहे असं वाटत असतानाच कर्णधार रोहित शर्माने बुमराहकरवी मॅथ्यूजला माघारी धाडलं. यानंतर ठराविक अंतराने धनंजय डी-सिल्वाही आश्विनचा शिकार ठरला. त्यामुळे चांगली सुरुवात केल्यानंतरही लंकेचा संघ अडचणीत सापडला. अखेरीस निसंका आणि असलंका यांनी उरलेला दिवस खेळून काढत संघाची पडझड रोखली.
शंभरावी कसोटी आणि विराट-सचिनची तुलना, कोहली मोडू शकेल का तेंडुलकरचा रेकॉर्ड?
त्याआधी, दुसऱ्या दिवशी जाडेजा आणि आश्विन जोडीने पुन्हा एकदा श्रीलंकन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. मैदानावर जम बसलेल्या दोन्ही खेळाडूंनी काही सुंदर फटके खेळीत महत्वपूर्ण भागीदारी रचली. पहिलं सत्र संपायच्या आधी लकमलने आश्विनला माघारी धाडत भारताला धक्का दिला. यानंतर रविंद्र जाडेजाने जयंत यादवच्या साथीने आपलं कसोटी कारकिर्दीतलं दुसरं शतक साजरं केलं.
रोहितचा तो निर्णय, जड्डूची हुकलेली डबल सेंच्युरी; फॅन्स द्रविडवर नाराज…काय घडलं मोहालीत?
दरम्यान भारतीय गोलंदाजांनीही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत लंकेच्या डावाला वेसण घातली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज श्रीलंकेला फॉलोऑन देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Ind vs SL : शतकी खेळीत विराट कोहलीचा विक्रम, परंतू शतकाची प्रतीक्षा अजुनही कायम
ADVERTISEMENT