रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने श्रीलंकेवर बंगळुरु कसोटीत तिसऱ्याच दिवशी सफाईदार विजय मिळवत टी-२० पाठोपाठ कसोटी मालिकेतही निर्भेळ यश संपादन केलं आहे. बंगळुरुतल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा २३८ धावांनी पराभव केला. दोन्ही डावांमध्ये अर्धशतकी खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर तर ऋषभ पंतला मालिकावीराचा किताब देण्यात आला.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर २५२ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात फक्त १०९ धावांपर्यंत मजल मारु शकला. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात भारताचा निम्मा संघ गारद केला. पहिल्या डावात लंकेकडून अँजलो मॅथ्यूजने ४३ धावांची इनिंग खेळली.
पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. ऋषभ पंत, श्रेयस अय्यरची अर्धशतक आणि त्यांना कर्णधार रोहित शर्मा, हनुमा विहारी आणि अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ३०३ धावांचा टप्पा गाठून श्रीलंकेला ४४७ धावांचं मोठं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करत असताना दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची एक विकेट पडल्यामुळे दयनीय अवस्था झाली होती.
तिसऱ्या दिवशी कर्णधार दिमुथ करुणरत्ने आणि कुशल मेंडीस यांनी श्रीलंकेच्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी झाल्यानंतर आश्विनने मेंडीसला आऊट करत श्रीलंकेची जोडी फोडली. यानंतर श्रीलंकेच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. कर्णधार करुणरत्नेने एक बाजू लावून धरत आपलं शतक झळकावलं पण त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. अखेरीस २०८ धावांवर श्रीलंकेचा दुसरा डाव संपुष्टात आला. भारताकडून दुसऱ्या डावात आश्विनने ४, बुमराहने ३, अक्षर पटेलने २ तर जाडेजाने १ विकेट घेतली.
ADVERTISEMENT