भारताची अनुभवी महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचं India Open स्पर्धेतलं आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आलेलं आहे. नागपूरच्या २० वर्षीय मालविका बनसोड या युवा खेळाडूने सायनाचा नवी दिल्लीच्या खाशाबा जाधव मैदानात १७-२१, ९-२१ असा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला आहे. अवघ्या ३३ मिनीटांत सायनाचं आव्हान मालविकाने संपुष्टात आणलं.
ADVERTISEMENT
सायना नेहवालवर पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर जाण्याची वेळ आली होती. परंतू चेक रिपब्लीकच्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध पहिला सेट सायनाने २२-२० च्या फरकाने जिंकला. यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सायनाला विजयी घोषित करण्यात आलं. परंतू तिचा हा प्रवास नागपूरच्या तरुण मालविकाने दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आणला आहे.
संपूर्ण सामन्यात मालविकाने आपला संयम कायम ठेवत उत्कृष्ट फटके खेळत ऑलिम्पिक पदक विजेत्या सायनाला निष्प्रभ करुन सोडलं. दुखापतींमुळे २०२१ या वर्षात सायना एकही महत्वाची स्पर्धा खेळू शकली नाही. परंतू आगामी काळात आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांचा विचार करता सायनाने घरच्या मैदानावर इंडिया ओपन मध्ये सहभागी होण्याचं ठरवलं. परंतू या स्पर्धेतही तिचं आव्हान संपुष्टात आलंय.
दुसऱ्या बाजूला पी.व्ही.सिंधूने भारताच्या इरा शर्माचा दुसऱ्या फेरीत २१-१०, २१-१० असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. याव्यतिरीक्त भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि आश्विनी पोनाप्पा यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या स्पर्धेत सहभागी होता आलेलं नाही.
महाराष्ट्राच्या ‘फुलराणी’च्या मार्गात कोरोनाचा अडसर, ऑलिम्पिक स्वप्नासाठी हवेत आर्थिक पाठबळाचे पंख
ADVERTISEMENT