रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात पराभवाने झाली आहे. ब्रेबॉन स्टेडीअमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्लीने मुंबईवर ४ विकेट्सने मात केली आहे. विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं आव्हान दिल्लीने अक्षर पटेल आणि ललित यादवच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. अखेरच्या ओव्हर्समध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी केलेला स्वैर मारा आणि मोक्याच्या क्षणी सोडलेला कॅच संघाला चांगलाच महागात पडला.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. विशेषकरुन रोहित शर्माने दिल्लीच्या बॉलर्सवर तुटून पडत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. कुलदीप यादवने रोहितला ४१ धावांवर आऊट करत मुंबईची जोडी फोडली. यानंतर मुंबईचे इतर फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत असताना इशान किशनने एक बाजू लावून धरली.
तिलक वर्मा, डॅनिअल सम्स आणि टीम डेव्हीड यांच्या साथीने इशान किशनने फटकेबाजी करत अर्धशतक झळकावत मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. इशान किशन अखेरपर्यंत ८१ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीकडून कुलदीप यादवने ३ तर खलिल अहमदने २ विकेट घेतल्या.
IPL 2022 : छोटा पॅकेट बडा धमका, महागडा खेळाडू इशान किशनने केली दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई
प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सनेही डावाची सावध सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि टीम सेफर्ट यांनी फटकेबाजी करत मुंबईच्या बॉलर्सवर दडपण आणलं. मुरगन आश्विनने एकाच षटकात टीम सेफर्ट आणि मनदीप सिंगला आऊट करत मुंबईला दुहेरी यश मिळवून दिलं. पाठोपाठ ऋषभ पंतही मिल्सच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. यानंतर पृथ्वी शॉने ललित यादवच्या साथीने संघाचा डाव सावरला.
ही जोडी मैदानावर स्थिरावते आहे असं वाटत असतानाच बसिल थम्पीने पृथ्वी शॉला माघारी धाडलं. वेस्ट इंडिजचा पॉवेलही आपली चमक दाखवू शकला नाही. यानंतर शार्दुल ठाकूरने ललित यादवच्या साथीने फटकेबाजी करत दिल्लीच्या संघाचं आव्हान कायम राखलं. थम्पीने शार्दुलचा अडसर दूर केल्यानंतर सामना मुंबईच्या दिशेने पूर्णपणे झुकला असं चित्र निर्माण झालं. परंतू यानंतर मैदानावर उतरलेल्या अक्षर पटेलने ललित यादवला मोलाची साथ देत सामन्याचं चित्रच पालटवून टाकलं.
IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सला झुकतं माप? रोहित इतर संघांना आपल्या खास शैलीत दिलं उत्तर
अखेरच्या षटकांमध्ये मुंबईच्या टीम डेव्हीडने सोपा कॅच सोडत दिल्लीला दिलेलं जिवदान मुंबईला चांगलंच महागात पडलं. मुंबईकडून थम्पीने ३, मुरगन आश्विनने २ तर टायमल मिल्सने १ विकेट घेतली.
दोन महिने चालणार IPL चा थरार; जिओने निवडक यूजर्ससाठी आणली खास ‘क्रिकेट प्लान’
ADVERTISEMENT