आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी आपला वरचष्म कायम राखला आहे. इशान किशन, दीपक चहर, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा, हर्षल पटेल या खेळाडूंना १० कोटी आणि त्यापेक्षा जास्त रकमेची बोली लागली आहे. मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी सर्वाधिक १५.२५ कोटी रुपये खर्च करत त्याला आपल्या संघात कायम राखलं आहे.
ADVERTISEMENT
याव्यतिरीक्त दीपक चहरसाठी चेन्नई सुपरकिंग्ज संघाने १४ कोटी रुपये मोजले. मराठमोळा शार्दुल ठाकूर १० कोटी ७५ लाखांच्या बोलीवर दिल्लीच्या संघाकडून खेळणार असून मुंबईकर श्रेयस अय्यर हा १२.२५ कोटींच्या घरात कोलकाता संघाचा सदस्य झाला आहे. परदेशी खेळाडूंपेक्षा यंदाच्या हंगामात पहिल्या दिवशी संघमालक भारतीय खेळाडूंना संघात दाखल करुन घेण्यासाठी उत्सुक दिसले.
याव्यतिरीक्त वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनसाठीही हैदराबादने १० कोटी ७५ लाख मोजले. याचसोबत अंबाती रायडू, जॉनी बेअरस्टो, दिनेश कार्तिक यांनाही चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या पहायला मिळाल्या.
पहिल्या टप्प्यात Marquee Players च्या यादीत श्रेयस अय्यर व्यतिरीक्त कमिन्स (७ कोटी २५ लाख बोली) कोलकाता संघाकडून, कगिसो रबाडा (९ कोटी २५ लाख बोली) पंजाब संघाकडून, धवन (८ कोटी २५ लाख बोली) पंजाब संघाकडून, डु-प्लेसिस (७ कोटींची बोली) RCB संघाकडून यांना चांगल्या रकमेची बोली मिळाली याव्यतिरीक्त आज दिवसभरात काही आश्चर्यकारक निकाल पहायला मिळाले.
क्विंटन डी-कॉकसाठीही मुंबईने बोली न लावल्यामुळे तो नवीन हंगामात लखनऊ संघाकडून खेळताना दिसेल. दुसऱ्या टप्प्यात महत्वाच्या खेळाडूंची निराशा झाली. सुरेश रैना, डेव्हिड मिलर, स्टिव्ह स्मिथ, मोहम्मद नबी यांच्यावर कोणीही बोली लावली नाही. शेमरॉन हेटमायरसाठी राजस्थान रॉयल्सने ८ कोटी ७५ लाख रुपये मोजले. श्रीलंकेच्या हसरंगावरही RCB ने १० कोटी ७५ लाखांची बोली लावली.
अकराव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (Uncapped Spinners)
१) नूर अहमद ३० लाखांच्या बोलीवर अहमदाबादच्या संघाकडे
२) मुरगन आश्विनसाठी मुंबई आणि कोलकात्यात चढाओढ, कोलकाता स्पर्धेतून बाहेर आणि हैदराबादची स्पर्धेत एंट्री. १ कोटी ६० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सकडून खेळणार.
३) एम.सिद्धार्थवर पहिल्या फेरीत बोली नाही.
४) के.सी.करिअप्पा, ३० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार.
५) श्रेयस गोपाळ, ७५ लाखांच्या बोलीवर हैदराबाद संघाकडून खेळणार.
६) जगदीश सुचित, २० लाखांच्या बोलीवर हैदराबाद संघाकडून खेळणार.
७) आर. साई किशोर ३ कोटींच्या बोलीवर अहमदाबादच्या संघाकडून खेळणार.
८) संदीप लामिच्छाने नेपाळचा फिरकीपटू लिलावासाठी मैदानात, परंतू संदीपची झोळी पहिल्या फेरीत रिकामीच राहणार, कोणत्याही संघाकडून संदीपवर बोली नाही.
दहाव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (Uncapped Fast Bowlers)
१) बसिल थम्पी ३० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार.
२) कार्तिक त्यागीवर बोलीला सुरुवात, ४ कोटींच्या बोलीवर हैदराबादने घेतलं विकत.
३) आकाशदीप RCB च्या ताफ्यात दाखल, २० लाखांची लागली बोली.
४) के.एम.असिफ चेन्नईच्या संघात दाखल, २० लाखांची लाखली बोली.
५) आवेश खानसाठी बोलीला सुरुवात, मुंबई, लखनऊ आणि हैदराबादमध्ये चुरस…१० कोटींच्या बोलीवर खेळणार लखनऊ संघाकडून
६) इशान पोरेल २५ लाखांच्या बोलीवर पंजाब संघाकडून खेळणार
७) मराठमोळ्या तुषार देशपांडेवर चेन्नई सुपरकिंग्जची बोली, २० लाखांच्या बोलीवर घेतलं संघात
८) अंकीत सिंग राजपूत ५० लाखांच्या बोलीवर लखनऊ संघात दाखल
नवव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (Uncapped Wicketkeeper)
१) के.एस. भरतवर लागत आहे बोली, २ कोटी खर्च करत दिल्लीने घेतलं आपल्या संघात
२) मोहम्मद अझरुद्दीनवर लागत आहे बोली, कोणत्याही संघाकडून अझरुद्दीनवर बोली नाही.
३) विष्णू विनोदवरही पहिल्या फेरीत बोली नाही.
४) विष्णू सोळंकीवर पहिल्या फेरीत बोली नाही.
५) अनुज रावतवर बोलीला सुरुवात, हैदराबाद आणि बंगळुरुत चढाओढ. ३ कोटी ४० लाखांच्या बोलीवर अनुज RCB कडून खेळणार.
६) प्रबसिमरन सिंगवर बोलीला सुरुवात, पंजाब आणि लखनऊमध्ये झुंज…६० लाखांच्या बोलीवर प्रबसिमरन सिंग पंजाबच्या संघाकडून खेळणार.
७) एन. जगदीशनवर पहिल्या फेरीत बोली नाही.
८) शेल्डन जॅक्सनवर बोलीला सुरुवात, कोलकाता आणि लखनऊमध्ये चुरस…६० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार.
९) जितेश शर्मा २० लाखांच्या बोलीवर पंजाब किंग्ज संघाकडून खेळणार.
आठव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (Uncapped All Rounders)
१) रियान परागवर लागते आहे बोली, चेन्नई आणि राजस्थानमध्ये पहिल्या फेरीत चढाओढ. १ कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर चेन्नई स्पर्धेबाहेर. गुजरातची स्पर्धेत एंट्री. अखेरपर्यंत राजस्थान स्पर्धेत कायम ३ कोटी ८० लाखांच्या बोलीसह राजस्थानकडून खेळणार
२) अभिषेक शर्मावर बोलीला सुरुवात, पंजाब आणि हैदराबादमध्ये चुरस. ५५ लाखांच्या बेस प्राईजवरुन अभिषेक शर्मा पोहोचला ५ कोटींच्या घरात. पंजाबची स्पर्धेतून माघार, अहमदाबादची स्पर्धेत एंट्री…६ कोटी ५० लाखांच्या बोलीवर अभिषेक शर्मा अखेरीस हैदराबादच्या संघात दाखल
३) सरफराज खान २० लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल.
४) शाहरुख खानवर बोलीला सुरुवात, चेन्नईने लावली पहिली बोली….कोलकात्याचीही स्पर्धेत एंट्री. कालांतराने कोलकाता स्पर्धेतून बाहेर, पंजाबची स्पर्धेत एंट्री. ४० लाखांच्या बेस प्राईजवरुन शाहरुख खान ५ कोटींच्या घरात….९ कोटींच्या बोलीवर शाहरुख यंदाही पंजाबकडून खेळणार.
५) शिवम मावीवर लावली जात आहे बोली, ४० लाखांच्या बोलीवरुन मावीची ७ कोटींपर्यंत मजल. ७ कोटी २५ लाखांच्या बोलीवर मावी पुन्हा कोलकाता संघाकडून खेळणार.
६) राहुल तेवतियावर बंपर बोली, चेन्नई आणि गुजरातच्या लढतीत गुजरातची बाजी. ९ कोटींची बोली लावत तेवतियाला घेतलं संघात
७) कमलेश नागरकोटीवर लावली जात आहे बोली, १ कोटी १० लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार.
८) हरप्रीत ब्रारवर लावली जात आहे बोली, ३ कोटी ८० लाखांच्या बोलीवर पंजाबने हरप्रीतला घेतलं संघात
९) शाहबाज अहमद २ कोटी ४० लाखांच्या बोलीवर RCB कडून खेळणार.
सातव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवाच – (Uncapped Players)
१) रजत पाटीदार पहिल्याच फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाकडून बोली नाही.
२) प्रियम गर्ग २० लाखांच्या बोलीवर हैदराबाद संघाकडून खेळणार.
३) अभिनव सदरंगानी २ कोटी ६० लाखांच्या बोलीवर अहमदाबाद संघाकडून खेळणार.
४) डिवॉल्ड ब्रेविस ३ कोटींच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार.
५) आश्विन हेब्बार, २० लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार.
६) अनमोलप्रीत सिंगवर पहिल्या फेरीत बोली नाही.
७) पुण्याच्या राहुल त्रिपाठीसाठी चेन्नई आणि कोलकात्यामध्ये चढाओढ सुरु, हैदराबादने मारली बाजी. ८ कोटी ५० लाख मोजत घेतलं संघात
८) सी. हरी निशांत पहिल्या फेरीत अनसोल्ड
सहाव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (फिरकीपटू)
१) इंग्लंडच्या आदिल रशिदवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.
२) अफगाणिस्तानच्या मुजीब झरदानला पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.
३) सलग तिसरा फिरकीपटू अनसोल्ड, इमरान ताहीरवर कोणत्याही संघाची बोली नाही.
४) भारताच्या कुलदीप यादववर लावली जात आहे बोली, २ कोटींच्या बोलीवर खेळणार दिल्ली कॅपिटल्स संघाकडून
५) ऑस्ट्रेलियाच्या झॅम्पावर लावली जात आहे बोली, परंतू पहिल्या फेरीत झॅम्पाच्या पदरी निराशा
६) राहुल चहरवर लावण्यात येत आहे बोली, पहिल्या फेरीत मुंबईकडून चहरवर बोली नाही. हैदराबाद आणि दिल्लीमध्ये चहरसाठी चुरस सुरु. पंजाबचीही शर्यतीत उडी. कालांतराने मुंबई इंडियन्सही शर्यतीत दाखल. अखेरीस ५ कोटी २५ लाखांच्या बोलीवर राहुल चहर पंजाब किंग्स संघात दाखल
७) युजवेंद्र चहलवर लावली जात आहे बोली, मुंबई आणि दिल्लीची पहिल्या फेरीत झुंज. कालांतराने दिल्ली शर्यतीतून बाहेर, हैदराबादची शर्यतीत एंट्री. हैदराबाद शर्यतीतून बाहेर गेल्यानंतर राजस्थान शर्यतीत दाखल. पहिल्यापासून आघाडीवर असलेली मुंबई बाहेर, ६ कोटी ५० लाखांच्या बोलीवर चहल राजस्थान रॉयल्सच्या संघात दाखल
८) अमित मिश्रावर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.
पाचव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (गोलंदाज)
१) टी. नटराजनवर लागते आहे बोली, हैदराबाद आणि गुजरातमध्ये नटराजनसाठी रस्सीखेच सुरु. ४ कोटींच्या बोलीवर नटराजन हैदराबाद संघात दाखल.
२) दीपक चहरवर लागते आहे बोली, चेन्नई आणि दिल्लीच्या चढाओढीत दीपक चहरने ओलांडला १० कोटींचा टप्पा. दिल्ली शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर राजस्थानची शर्यतीत उडी. अखेरीस १४ कोटींच्या बोलीवर दीपक चहर पुन्हा एकदा चेन्नईत दाखल.
३) उमेश यादववर लावली जात आहे बोली, पहिल्या फेरीत उमेश अनसोल्ड
४) प्रसिध कृष्णा मैदानात, लखनऊ आणि राजस्थानमध्ये प्रसिध कृष्णासाठी चढाओढ. अखेरीस १० कोटींच्या बोलीवर प्रसिध कृष्णा राजस्थानच्या संघात दाखल
५) न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनवर लागते आहे बोली, १० कोटींच्या बोलीवर खेळणार अहमदाबादच्या संघाकडून
६) ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवूडवर लागते आहे बोली, पहिल्या टप्प्यात दिल्ली, चेन्नई आणि मुंबईची हेजलवूडसाठी बोली. अखेरच्या क्षणी बाजी मारत RCB ने हेजलवूडला ७ कोटी ७५ लाखांची बोली लावत घेतलं संघात
७) मार्क वुड ७ कोटी ५० लाखांच्या बोलीवर लखनऊ सुपरजाएंट संघाकडून खेळणार
८) भारताच्या भुवनेश्वर कुमारवर बोलीला सुरुवात, ४ कोटी २० लाखांच्या बोलीवर भुवनेश्वर हैदराबादकडून खेळणार
९) शार्दुल ठाकूरवर लावली जात आहे बोली, शार्दुल ठाकूरने ओलांडला १० कोटींचा टप्पा. दिल्ली आणि पंजाबमध्ये शार्दुलसाठी चढाओढ. १० कोटी ७५ लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार शार्दुल
१०) बांगलादेशच्या मुस्तफिजूर रेहमानवर लावली जात आहे बोली, २ कोटींच्या बेसिक प्राईजवर मुस्तफिजूर दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल
चौथ्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – ( विकेटकिपर खेळाडू)
१) ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडवर पहिल्या टप्प्यात कोणत्याही संघाकडून बोली नाही, वेड अनसोल्ड
२) अंबाती रायडुवर लागते आहे बोली, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये अंबाती रायडूसाठी रस्सीखेच. हैदराबादची चेन्नईला कडवी लढत. ६ कोटी ७५ लाखांच्या बोलीवर रायडू चेन्नईच्या संघात दाखल
३) इशान किशनवर लागते आहे बोली, मुंबई आणि पंजाब किंग्जमध्ये रस्सीखेच सुरु. पंजाब बाहेर पडल्यानंतर गुजरातची शर्यतीत एंट्री. इशान किशनने गाठला १० कोटींचा टप्पा. श्रेयस अय्यरला मागे टाकत इशान किशन आजच्या दिवसातला आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. १५ कोटी २५ लाखांची बोली लावत इशान किशन मुंबईच्या संघात दाखल.
४) इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोवर लागते आहे बोली, ६.७५ कोटींच्या बोलीवर बेअरस्टो पंजाबच्या संघात दाखल
५) दिनेश कार्तिकवर लागते आहे बोली, चेन्नई आणि बंगळुरुच्या लढाईत कार्तिक ५ कोटी ५० लाखांच्या बोलीवर RCB मध्ये दाखल
६) वृद्धीमान साहावर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.
७) सॅम बिलींग्जवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.
८) वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनसाठी लागते आहे बोली, १० कोटी ७५ लाखांच्या बोलीवर निकोलस पूरन खेळणार हैदराबाद संघाकडून
तिसऱ्या टप्प्यातील खेळाडूंवर बोलीला सुरुवात – (ऑल राऊंडर खेळाडू)
१) ड्वेन ब्राव्होवर बोलीला सुरुवात, वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूसाठी चेन्नई आणि हैदराबादमध्ये चुरस सुरु. ३ कोटी २० लाखांवर हैदराबादची माघार आणि दिल्लीची शर्यतीत उडी. दिल्लीची कालांतराने माघार आणि ४ कोटी ४० लाखांच्या बोलीवर ब्राव्हो स्वगृही चेन्नईत दाखल
२) नितेश राणावर लागतेय बोली, मुंबई आणि कोलकातामध्ये नितीशसाठी चढाओढ. ४ कोटी ८० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सची शर्यतीतून माघार. चेन्नई आणि लखनऊचा संघही शर्यतीत दाखल, अल्पावधीत नितेश राणाची ७ कोटींपर्यंत मजल. अखेरीस ८ कोटींच्या बोलीवर नितेश राणा स्वगृही कोलकात्यात दाखल
३) जेसन होल्डरवर लागतेय बोली, चेन्नई आणि मुंबईच्या शर्यतीत अल्पावधीत जेसन होल्डर पोहचला ५ कोटींच्या घरात. राजस्थान आणि लखनऊची स्पर्धेत उडी. ८ कोटी ७५ लाखांच्या बोलीवर होल्डर लखनऊ सुपरजाएंट संघात दाखल.
४) बांगलादेशच्या शाकीब अल-हसनवर लागतेय बोली, पहिल्या टप्प्यात हसनवर कोणीही बोली लावली नाही; ठरला अनसोल्ड.
५) हर्षल पटेलसाठी RCB ने पहिल्या प्रयत्नात दाखवली पसंती, CSK आणि RCB मध्ये चढाओढ सुरु. CSK बाहेर पडल्यानंतर SRH ची शर्यतीत उडी. श्रेयस अय्यरपाठोपाठ हर्षल पटेलने ओलांडला १० कोटींचा टप्पा. हैदराबाद शर्यतीतून बाहेर, १० कोटी ७५ लाखांच्या बोलीवर हर्षल पटेल स्वगृही RCB मध्ये दाखल
६) दीपक हुडावर लागतेय बोली, राजस्थान आणि RCB मध्ये चुरस. मुंबई आणि चेन्नईही दीपक हुडासाठी शर्यतीत दाखल, हुडाचा भाव वधारला. ५ कोटी ७५ लाखांच्या बोलीवर दीपक हुडा लखनऊ संघात दाखल.
७) श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगावर लागतेय बोली, पंजाब आणि हैदराबादमध्ये हसरंगासाठी चुरस. हसरंगाचा भाव वधारला, RCB शर्यतीत दाखल. पंजाब आणि बंगळुरुच्या चढाओढीत हसरंगाची मोठी उडी. १० कोटींच्या बोलीचा टप्पा हसरंगाने ओलांडला. १० कोटी ७५ लाखांच्या बोलीवर हसरंगा RCB मध्ये दाखल
८) वॉशिंग्टन सुंदरवर लागते आहे बोली, ८ कोटी ७५ लाखांच्या बोलीवर सुंदर हैदराबादच्या संघात दाखल. आजच्या दिवसात हैदराबादने घेतला पहिला खेळाडू.
९) कृणाल पांड्यावर लागत आहे पुढची बोली, कृणाल पांड्यासाठी चेन्नई आणि पंजाबमध्ये चुरस. पंजाब शर्यतीतून बाहेर आणि लखनऊची एंट्री, कृणालने ओलांडला ६ कोटींचा टप्पा. अखेरीस ८ कोटी २५ लाखांच्या बोलीवर कृणाल लखनऊ सुपरजाएंट संघात दाखल
१०) ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श ६ कोटी ५० लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल
११) अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीवर बोलीला सुरुवात, परंतू पहिल्या टप्प्यात नबीवर कोणत्याही संघाकडून बोली लागली नाही.
दुसऱ्या टप्प्यातील महत्वाच्या खेळाडूंवर बोलीला सुरुवात –
१) मनिष पांडेवर हैदराबाद, दिल्ली आणि लखनऊमध्ये चुरस; ४ कोटी ६० लाखांच्या बोलीवर खेळणार लखनऊ संघाकडून
२) वेस्ट इंडिजच्या शेमरॉन हेटमायरवर बोलीला सुरुवात, दिल्ली आणि राजस्थानमध्ये हेटमायरसाठी चढाओढ. ८ कोटी ५० लाखांच्या बोलीवर दिल्ली शर्यतीतून बाहेर. अखेरीस हेटमायर राजस्थानमध्ये दाखल, बोली लागली ८ कोटी ५० लाख.
३) रॉबीन उथप्पावर चेन्नईची बोली, २ कोटींच्या बोलीवर उथप्पा चेन्नई सुपरकिंग्जमध्ये दाखल
४) इंग्लंडच्या पहिल्या खेळाडूवर लागणार बोली. जेसन रॉयसाठी अहमदाबादचा संघ उतरला मैदानात. २ कोटींच्या बोलीवर जेसन रॉय अहमदाबादच्या संघात दाखल
५) दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हीड मिलरवर लागतेय बोली, कोणत्याही संघाकडून मिलरवर बोली लागली नाही. पहिल्या टप्प्यात मिलर अनसोल्ड
६) भारताच्या देवदत्त पड्डीकलवर लागतेय बोली, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये पड्डीकलसाठी चढाओढ. ७ कोटी ७५ लाखाच्या बोलीवर मुंबई इंडियन्स आऊट. अखेरीस पड्डीकल ७ कोटी ७५ लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघात दाखल
७) अनुभवी खेळाडू रैनावर लागतेय बोली, परंतू आश्चर्यकारकरित्या रैना पहिल्या टप्प्यात अनसोल्ड
८) ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथवर लागतेय बोली, लागोपाठ दुसरा खेळाडू अनसोल्ड. स्मिथसाठी कोणताही संघ उत्सुक नाही.
पहिल्याच टप्प्यात Marquee Players वर लागणार बोली –
१) शिखर धवनवर पहिल्यांदा बोलीला सुरुवात, दिल्ली आणि राजस्थान रॉयल्समध्ये शिखरसाठी चढाओढ. दिल्लीने ५ कोटींची बोली लावल्यानंतर राजस्थान रॉयल्स आऊट. यानंतर पंजाब किंग्जची लिलावात उडी, शिखरचा भाव वधारला. ८ कोटी २५ लाखांच्या बोलीत शिखर धवन पंजाब किंग्ज संघाकडून खेळणार.
२) अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन आश्विनवर दुसरी बोली, आश्विनसाठीही पहिल्यांदा दिल्ली आणि राजस्थान संघांमध्ये चुरस. ४ कोटी ६० लाखांवर दिल्लीची माघार…पण काही काळाताच दिल्ली पुन्हा शर्यतीत दाखल. दिल्लीची ५ कोटींवर माघार. अखेरीस रविचंद्रन आश्विन ५ कोटींच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघात दाखल.
३) २०२० च्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्सवर बोलीला सुरुवात. ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या पॅट कमिन्ससाठी संघांमध्ये सुरुवातीलाच जोरदार चढाओढ सुरु. कोलकाता नाईट रायडर्स आणि नवोदीत संघ अहमदाबाद टायटन्समध्ये कमिन्ससाठी चढाओढ…टायटन्सची माघार. अखेरीस ७ कोटी २५ लाखांच्या बोलीवर कमिन्स कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात दाखल
४) दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडावर बोलीला सुरुवात, दिल्ली आणि अहमदाबाद संघांमध्ये रबाडासाठी चुरस. ८ कोटींच्या बोलीवर दिल्ली रबाडासाठी आऊट. पंजाबची लिलावात एंट्री…९ कोटी २५ लाखांवर गुजरात आऊट. अखेरच्या क्षणी लिलावात एंट्री घेतलेल्या पंजाबने ९ कोटी २५ लाखांच्या बोलीवर रबाडाला घेतलं आपल्या संघात.
५) न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टवर बोलीला सुरुवात, बोल्टसाठी राजस्थान आणि RCB मध्ये पहिल्यांदाच चुरस. ५ कोटी ५० लाखांच्या बोलीवर RCB आऊट आणि मुंबई इंडियन्स शर्यतीत दाखल. आता मुंबई आणि राजस्थानमध्ये बोल्टला घेण्यासाठी चढाओढ सुरु. ८ कोटींच्या बोलीवर मुंबई इंडियन्स आऊट, राजस्थानचं पारडं जड. अखेरीस राजस्थानने मारली बाजी, ८ कोटींच्या बोलीवर बोल्टला घेतलं संघात.
६) मुंबईच्या श्रेयस अय्यरवर बोलीला सुरुवात, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकात्यामध्ये अय्यरसाठी चुरस. ९ कोटी ५० लाखांवर दिल्लीने घेतली माघार. लिलावात अहमदाबाद संघाची एंट्री. श्रेयसने ओलांडला १० कोटींच्या बोलीचा आकडा…१२ कोटी २५ लाखांच्या बोलीवर श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार.
७) अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीवर लागतेय बोली, शमीसाठी सुरुवातीला अहमदाबाद आणि RCB मध्ये चूरस. कालांतराने अहमदाबादची माघार आणि लखनऊची लिलावात एंट्री. शमी ६ कोटी २५ लाखांच्या बोलीवर अहमदाबाद टायटन्सच्या संघात दाखल
८) दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु-प्लेसिसवर बोलीला सुरुवात, चेन्नई सुपरकिंग्ज आणि RCB मध्ये पहिल्या टप्प्यात चुरस. दिल्लीचीही लिलावात उडी, डु-प्लेसिससाठी तीन संघ मैदानात. चेन्नई, दिल्लीची माघार, बंगळुरुचं पारडं जड. परंतू दिल्ली पुन्हा शर्यतीत परतलं, डु-प्लेसिसचा भाव वधारला. ७ कोटींच्या बोलीवर डु-प्लेसिस RCB च्या संघात दाखल.
९) क्विंटन डी-कॉकवर लागतेय बोली, मुंबई इंडियन्सकडून डी-कॉकवर सुरुवातीला बोली नाही. चेन्नई आणि लनखऊमध्ये डी-कॉकसाठी चढाओढ. ३ कोटी ८० लाखांवर चेन्नई आऊट आणि मुंबई इंडियन्स शर्यतीत दाखल. ५ कोटी २५ लाखांवर मुंबईची माघार आणि दिल्ली कॅपिटल्स शर्यतीत दाखल. आता डी-कॉकसाठी लखनऊ आणि दिल्लीत चुरस सुरु. अखेरीस ६ कोटी ७५ लाखांच्या बोलीवर डी-कॉक लखनऊ सुपरजाएंट संघात दाखल.
१०) SRH चा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर बोलीला सुरुवात, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये वॉर्नरसाठी चढाओढ. ६ कोटी २५ लाखांच्या बोलीवर वॉर्नरची स्वगृही वापसी. नवीन हंगामात दिल्लीकडून खेळणार.
ADVERTISEMENT