पुणे : कुस्तीगीर परिषदेत उभी फूट पडल्यामुळे ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा अहमदनगर की पुण्यात होणार याविषयीची संभ्रम अखेर दूर झाला आहे. 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा पुण्याला मिळाला असून संस्कृती प्रतिष्ठान तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
त्याबाबतचं पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी माजी महापौर आणि संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना दिलं. यावेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके उपस्थित होते.
याबाबत बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दुरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा सुरु झाली. आज मोठ्या शिखरावर स्पर्धा पोहोचली आहे. त्यातही आम्हा मोहोळ कुटुंबीयांकडे या स्पर्धेची जबाबदारी आली याचा मनापासून आनंद वाटतं आहे.
मागील सहा वर्षापासून यासाठी प्रयत्न करत होतो, अखेर याला यश आलं आहे. आता आम्ही चांगली स्पर्धा करु. कुस्तीमध्ये कुठेही राजकारण येणार नाही, याची काळजी आम्ही संयोजक म्हणून घेऊ. जुने-नवीन सगळ्यांना आदराने आणि सन्मानाने वागणूक देऊ. कारण आम्हाला कुस्तीचा विचार करायचा आहे. कुस्ती मोठी करायची आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करु.
11 ते 15 जानेवारी दरम्यान स्पर्धेचा थरार :
यावेळी खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणाले, महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे. 11 ते 15 जानेवारी 2022 या दरम्यान पुण्यात ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवली जाणार आहे. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत. छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले. त्यातून अनेक कुस्तीगीर घडले. तालीम संघ मोठ्या प्रमाणावर आहेत. तेव्हा ही स्पर्धा चांगल्या स्वरूपात पार पडेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT