इस्लामाबाद: तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंडचा (New Zealand) क्रिकेट संघ एकही मॅच न खेळता आपल्या मायदेशी परतणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे सीरीजची पहिली मॅच आजपासून (17 सप्टेंबर) खेळविण्यात येणार होती. पण खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने आपला संपूर्ण पाकिस्तान दौराच रद्द केला आहे. न्यूझीलंड क्रिकेटने घेतलेला हा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT
पाकिस्तानमध्ये काही वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा जवळजवळ बंदच आहेत. अशात तब्बल 18 वर्षानंतर न्यूझीलंड क्रिकेटने पाकिस्तानमध्ये आपला संघ धाडला होता. या दौऱ्यात न्यूझीलंडला तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची होती. न्यूझीलंड किक्रेट बोर्डाने आपला संघ पाकिस्तानात धाडल्याने पीसीबीला बराच आनंद झाला होता. पण ऐन मॅचच्या दिवशी न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव आपला दौराच रद्द केल्याने पीसीबीच्या आनंदावर आता विरजण पडलं आहे. याशिवाय खेळाडूंच्या सुरक्षेच्या बाबतीत पाकिस्तानी सरकार कमकुवत असल्याचं पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 17 सप्टेंबरपासून सुरू होणार होती. पण सुरक्षेच्या कारणामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने संपूर्ण पाकिस्तान दौराच रद्द केला आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. मात्र, खेळाडूंच्या सुरक्षेविषयी काही अलर्ट मिळाल्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे की, ही मालिका नंतर खेळविण्यात येईल. तूर्तास ती पुढे ढकलण्यात आली आहे.
खेळाडूंची सुरक्षेच्या बाबतीत अलर्ट मिळाल्याने न्यूझीलंडने कोणताही धोका न पत्करता संबंधित पाकिस्तान दौरा रद्द केला. न्यूझीलंड क्रिकेटचे (NZC) मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाइट म्हणाले की, ‘आम्हाला मिळालेला अलर्ट पाहता दौरा सुरू ठेवणे शक्य नव्हतं. मला माहिती आहे की हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी एक धक्का आहे. पण खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच आमच्यासमोर हा एकमेव पर्याय होता.’
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी लाहोरला जाण्यापूर्वी आजपासून आम्हाला पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची होती. तथापि, न्यूझीलंड सरकारकडून आम्हाला पाकिस्तानमधील वाढलेला धोका याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर आम्ही सुरक्षा सल्लागारांशी सल्ला-मसलत केली आणि नंतर हा निर्णय घेतला की, किवी संघ हा दौरा सुरु ठेवणार नाही. आता संघाच्या परतण्याची व्यवस्था केली जात आहे.’
ADVERTISEMENT