बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक पदासाठी बीसीसीआयने पुन्हा एकदा अर्ज मागवले आहेत. सध्या NCA चा संचालक म्हणून काम पाहत असलेल्या राहुल द्रविडचा कार्यकाळ संपलेला आहे. २०१९ साली राहुल द्रविडची २ वर्षांच्या कार्यकाळासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक म्हणून नियुक्ती झाली होती.
ADVERTISEMENT
गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या राखीव फळीतल्या खेळाडूंचं कौतुक झालं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना बीसीसीआयने श्रीलंकेत तरुण खेळाडूंचा संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पाठवला. एकाच वेळी भारताचे दोन संघ मैदानात उतरल्यामुळे राहुल द्रविडचं त्यावेळी कौतुक झालं. टीम इंडियाच्या यंगस्टर्सना मार्गदर्शन करुन राखीव खेळाडूंची फौज तयार करण्यात द्रविडने NCA चा संचालक म्हणून मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे द्रविड पुन्हा एकदा या पदासाठी अर्ज करणार असल्याचं कळतंय. १५ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना या पदासाठी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राहुल द्रविडला आगामी काळात भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी दिली जाऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे. सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ २०२१ टी-२० विश्वचषकानंतर संपतो आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठीची वयोमर्यादा ६० वर्ष इतकी आहे. रवी शास्त्रींनी यंदाच्या वर्षात मे महिन्यात ५९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविडला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र सोपवली जाऊ शकतात असाही अंदाज वर्तवला जात आहे.
राहुल द्रविड पुन्हा एकदा NCA च्या संचालकपदासाठी अर्ज करु शकतो अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. परंतू नोव्हेंबरदरम्यान रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकाच्या जागेसाठी विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी राहुल द्रविड हा बीसीसीआयसाठी महत्वाच्या भूमिकेत असणारच आहे असे संकेत सूत्रांनी दिले. नुकत्यात पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेत गेला होता.
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने वन-डे मालिका २-१ ने जिंकली होती. परंतू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर टी-२० मालिकेत भारताला १-२ असा पराभव स्विकारावा लागला होता. श्रीलंका दौऱ्यानंतर राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकाबद्दल विचारण्यात आलं होतं. परंतू त्यावेळी राहुल द्रविडने आताच्या घडीला मी नेमकं काहीच सांगू शकत नाही पण सध्या मी जे काही काम करतोय ते मला आवडतंय असं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे आगामी काळात राहुल द्रविड भारतीय संघासाठी कोणत्या भूमिकेत दिसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT