राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताचा तरुण संघ लंकेत ३ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळेल. टीम इंडियाच्या सिनीअर संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची ही पहिलीच वेळ असणार आहे. टीम इंडियाचे सध्याचे हेड कोच रवी शास्त्री आणि त्यांच्या टीमचा कार्यकाळ हा डिसेंबर अखेर पर्यंत संपणार आहे. अशा परिस्थितीत राहुल द्रविड हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा असा दावा माजी क्रिकेटपटू रितींदर सिंग सोढीने केला आहे.
ADVERTISEMENT
“राहुल द्रविडची श्रीलंका दौऱ्यासाठी झालेली नियुक्ती ही तात्पुरती नाही. तो टीम इंडियाचा कोच होण्यासाठी तयारीत आहेत. टी-२० वर्ल्डकप नंतर रवी शास्त्रींची मुदत संपते आहे, त्यानंतर त्यांच्या जागेसाठी द्रविड हा प्रमुख दावेदार आहे. रवी शास्त्रींनी हेड कोच म्हणून चांगलं काम केलंय, परंतू आता त्यांचा करार संपल्यानंतर द्रविडचा या जागेसाठी विचार केला जाईल. यासाठीच त्याला श्रीलंका दौऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रवी शास्त्रींची जागा भविष्यात राहुल द्रविडच घेऊ शकतो.” सोढी इंडिया न्यूज शी बोलत होते.
२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविड भारतीय फलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी बॅटींग कोच म्हणून सोबत गेला होता. यानंतर भारत अ आणि १९ वर्षाखालील संघाला मार्गदर्शन करण्यात राहुल द्रविडचा मोलाचा वाटा आहे. सध्या NCA चा संचालक म्हणून काम करत असलेला राहुल द्रविड अनेक खेळाडूंना घडवतो आहे. त्यामुळे राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचं श्रीलंकेत यशस्वी होणं टीम इंडियासाठी आहे गरजेचं, कारण…
ADVERTISEMENT