कसोटी मालिका १-२ ने गमावल्यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेत निराशाजनक कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतावर ७ विकेट राखून विजय मिळवला आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या २८८ धावांचं आव्हान आफ्रिकेने मलान, डी-कॉक आणि इतर फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. भारतीय गोलंदाज या सामन्यात पूर्णपणे निष्प्रभ ठरले.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून भारताने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने आपल्या अंतिम ११ मध्ये बदल केला नाही. लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांमध्येही पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी झाली. ही जोडी मैदानात तग धरतेय असं वाटत असतानाच मार्क्रमने शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर आलेला विराट कोहलीही केशव महाराजच्या बॉलिंगवर भोपळाही न फोडता माघारी परतला.
यानंतर मैदानात आलेल्या ऋषभ पंतने कर्णधार लोकेश राहुलला उत्तम साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी मैदानात तग धरुन भारताची पडझड रोखली. ऋषभ पंतने आक्रमक पवित्रा घेत काही सुंदर फटके खेळत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तीन वेळा जिवदान मिळालेल्या लोकेश राहुलनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दोघांमध्येही तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी झाली. मगालाने आफ्रिकेला मोक्याच्या क्षणी तिसरं यश मिळवून देत भारताला धक्का दिला. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर भारताच्या मधल्या फळीला पुन्हा एकदा गळती लागली.
ऋषभ पंत काही मिनीटातच तबरेज शम्सीच्या बॉलिंगवर बाद झाला. त्याने ७१ बॉलमध्ये १० फोर आणि २ सिक्स लगावत ८५ धावा केल्या. यानंतर श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनीही आजच्या सामन्यात निराशा केली. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर शार्दुल ठाकूरने आश्विनच्या साथीने फटकेबाजी करत भारताला २८७ धावांचा टप्पा गाठून दिला. आफ्रिकेकडून शम्सीने २ तर मगाला, मार्क्रम, महाराज आणि फेलुक्वायो या चौकडीने १-१ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेने दणक्यात सुरुवात करत पहिल्या बॉलपासूनच भारताच्या आव्हानातली हवा काढून घेतली. जानेमन मलान आणि क्विंटन डी-कॉक जोडीने चौफेर फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांना बॅकफूटला ढकललं. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी १३२ धावांची अभेद्य भागिदारी केली. आफ्रिकेची सलामीची जोडी भारताला महागात पडणार असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने डी-कॉकला माघारी धाडलं. डी-कॉकने ६६ बॉलमध्ये ७ चौकार आणि ३ षटकार लगावत ७८ धावा केल्या.
ICC T20 WC : आयसीसीने जाहीर केलं वेळापत्रक, भारत-पाकिस्तान ‘या’ दिवशी आमनेसामने
यानंतर मलानने कर्णधार टेंबा बावुमासोबत ८० धावांची भागीदारी करत सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. शतकाच्या ९ धावा दूर असताना मलान बुमराहच्या बॉलिंगवर बोल्ड झाला. पाठोपाठ टेंबा बावुमाही चहलच्या बॉलिंगवर सोपा कॅच देत ३५ धावा काढून माघारी परतला. एका क्षणाला भारतीय संघाला सामन्यात अंधुकशी विजयाची आशा निर्माण झाली होती असं वाटत होतं. परंतू एडन मार्क्रम आणि रासी व्हॅन डर डसेनने ही आशा फोल ठरवत आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
तो वाद अजुनही शांत नाही? Kohli ला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याच्या तयारीत होता गांगुली
ADVERTISEMENT