विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात धडाकेबाज पद्धतीने केली आहे. सेंच्युरिअन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ११३ धावांनी मात करत भारताने बाजी मारली आहे. या विजयासह भारताने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा हा विजय अत्यंत महत्वपूर्ण ठरला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेला सेंच्युरिअनच्या मैदानात हरवणारा पहिला आशियाई संघ हा मान विराट कोहलीच्या टीम इंडियाच्या नावे जमा झाला आहे.
ADVERTISEMENT
३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाअखेरीस आफ्रिकेची परिस्थिती बिकट झाली होती. ४ बाद ९४ अशा बिकट अवस्थेत सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अखेरच्या दिवशी सामना वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार होते. कर्णधार डीन एल्गरकडून आफ्रिकेच्या संघाला बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतू भारतीय गोलंदाजीसमोर आफ्रिकेच्या फलंदाजांची डाळ शिजू शकली नाही.
जसप्रीत बुमराहने डीन एल्गरला आऊट करत आफ्रिकेला सर्वात मोठा धक्का दिला. एल्गरने १५६ बॉलमध्ये १२ चौकार लगावत ७७ धावांची खेळी केली. डीन एल्गर माघारी परतल्यानंतर क्विंटन डी-कॉकने टेंबा बावुमाच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू ऑफ स्टम्प बाहेरील चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात तो देखील आपली विकेट गमावून बसला.
यानंतर उर्वरित फलंदाज हे फक्त हजेरीवीर ठरले. अखेरच्या फळीपैकी जेन्सनने बावुमाला थोडीफार साथ देण्याचा प्रयत्न केला, पण भारतापुढे त्याचे प्रयत्न फोलच ठरले. टेंबा बावुमाने अखेरपर्यंत एक बाजू लावून धरत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला पण त्याला दुसऱ्या बाजूने कोणाचीही साथ मिळाली नाही. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी ३-३ तर मोहम्मद सिराज आणि आश्विनने २-२ विकेट घेतल्या.
ADVERTISEMENT