भारतीय पुरुष बॅटमिंटन संघाने इतिहास घडवला. भारतीय बॅटमिंटन टीम पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडकली. ७३ वर्षांपासून खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. सुवर्ण पदकापासून भारत एक पाऊल दूर असून, रौप्य पदक निश्चित झालं आहे.
ADVERTISEMENT
थॉमस कप बॅटमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने शुक्रवारी २०१६ चा स्पर्धेचा विजेता डेन्मार्कचा ३-२ ने पराभव केला. आता अंतिम सामना रविवारी (१५ मे) भारत आणि इंडोनेशिया यांच्यात होणार आहे.
जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या प्रणयने घसरून पडल्यानंतरही विजय मिळवला. मेडिकल टाइमआउट घेतल्यानंतर प्रणयने १३-२१, २१-९, २१-१२ अशा फरकाने विजय मिळवला.
डेन्मार्कविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक विजेता लक्ष्य सेन चांगला खेळ करू शकला नाही. त्यामुळे डेन्मार्कने आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी विजय मिळवत १-१ अशी बरोबरी साधली.
या दोघांनी डेन्मार्कच्या किम अस्ट्रूप आणि मथियास क्रिस्टियनसेन यांचा २१-१८, २१-२३, २२-२० अशा फरकाने पराभव केला. त्यानंतर किदांबी श्रीकांने एंडर्स एंटोनसेन याचा २१-१८, १२-२१, २१-१५ अशा पराभव करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर एंडर्स स्कारूप रास्मुसेन आणि फ्रेडरिक सोगार्डने या जोडीने भारताच्या कृष्णा प्रसाद गारागा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला यांचा पराभव केला. १४-२१,१३-२१ अशा फरकाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर अनुभवी खेळाडू एचएस प्रणयने पहिला सेट गमावल्यानंतर सामन्यात वापसी केली आणि लागोपाठ दोन्ही सेट जिंकत भारताचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित केलं.
भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीत किदांबी श्रीकांत, सात्विक साईराज आणि एचएस प्रणय यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. श्रीकांतने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. श्रीकांतने पाचही सामन्यात विजय मिळवला. असं असलं तरी भारताची सुरूवात पराभवाने झाली होती.
ADVERTISEMENT