तब्बल ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहासाची नोंद करत कांस्यपदकाची कमाई केली. अटीतटीच्या लढतीत भारताने जर्मनीवर ५-४ ने मात करत बाजी मारली. १९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरचं गोल्ड मेडल जिंकलं होतं. भारतीय संघाच्या या विजयात मोलाची भूमिका बजावली ती म्हणजे गोलकिपर पी.आर.श्रीजेशने.
ADVERTISEMENT
जर्मनीविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यानंतर श्रीजेशने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भारतीय संघाचे कोच ग्रॅहम रिड यांनी सामना सुरु होण्याआधी काय खास संदेश दिला याची माहिती श्रीजेशने दिली.
“भारतीय हॉकीसाठी, आमच्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे. एखादं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना आता मनात आहे. मला आता खूप भारी वाटतंय, २१ वर्ष झाले मी खेळतोय, आज या कष्टांचं चीज झालंय. अखेरच्या क्षणांमध्ये पेनल्टी कॉर्नर अडवताना मी तणावाखाली होतो, मला काहीही करुन गोल होऊ द्यायचा नव्हता. सामना सुरु व्हायच्या आधी कोचने (ग्रॅहम रिड) आम्हाला खुर्च्यांवर उभं केलं. यानंतर ते म्हणाले असा विचार करा की तुम्ही पोडीअमवर उभे आहात आणि तुमच्या गळ्यात मेडल आहे. ज्यावेळेला सामन्याला सुरुवात झाली, त्यावेळी मी फक्त हीच गोष्ट लक्षात ठेवली होती.”
एका क्षणाला या सामन्यात भारत १-३ अशा पिछाडीवर होता. परंतू यानंतर भारतीय खेळाडूंनी सामन्याचं चित्रच पालटलं आणि सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. जर्मनीचा बचाव भेदून पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात भारतीय खेळाडूंना यश आलं. भारताच्या या आक्रमणासमोर जर्मनीची टीम दबावाखाली खेळताना दिसली. सामन्याच्या अखेरीस जर्मनीने पलटवार करण्याचा प्रयत्न केला, परंतू श्रीजेश आणि भारतीय बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.
BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये ‘फिनीक्स’भरारी
ADVERTISEMENT