टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारताचं पहिलं पदक निश्चीत झालं आहे. पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात रवी कुमारने कझाकस्तानच्या नुरीस्लाम सानायेवचा पराभव केला. अतीशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात एका क्षणाला रवी कुमार जवळपास ८ गुणांनी पिछाडीवर पडला होता. परंतू अखेरपर्यंत हार न मानता त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला चितपटचा हुकुमी डाव वापरत पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
ADVERTISEMENT
या विजयासह भारताचं कुस्तीत पदक निश्चीत झालं असून रवी कुमारला आता भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुषांमधून सुशील कुमारने भारतासाठी शेवटचं कुस्तीतलं पदक जिंकलं होतं. २०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या साक्षी मलीकने कांस्यपदकाची कमाई केली होती.
दोन्ही खेळाडूंमधला पहिला राऊंड हा एकमेकांचा अंदाज घेण्यात गेला. त्यातल्या त्यात रवी कुमारने आक्रमकता न दाखवल्यामुळे पंचांनी त्याला ३० सेकंदात गुण घेण्याचं आव्हान दिलं. यात तो अपयशी ठरल्यामुळे कझाकस्तानच्या खेळाडूला १ गुण बहाल करण्यात आला. परंतू रवी कुमारने हार न मानता हुकुमी डाव टाकत २ गुणांची कमाई केली. पहिल्या राऊंड अखेरीस भारताकडे २-१ अशी आघाडी होती.
दुसऱ्या राऊंडमध्ये नुरीस्लामने सामन्याचं चित्रच पालटलं. रवी कुमारच्या पायांचा ताबा घेत त्याने गुणांची वसूली करत मोठी आघाडी घेतली. एका क्षणाला नुरीस्लामकडे ९-२ अशी मोठी आघाडी होती. परंतू राऊंड संपण्यासाठी शेवटचं दीड मिनीट बाकी असताना रवीने हार न मानता नुरीस्लामचा बचाव भेदत महत्वाचे ३ गुण कमावत आपली पिछाडी ९-५ अशी कमी केली. या प्रयत्नात नुरीस्लामच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. तरीही त्याने हार न मानता सामना खेळणं पसंत केलं. परंतू रवीने याचा फायदा घेत नुरीस्लामला चीतपट करत बाजी मारुन अंतिम फेरीत प्रवेश केला.
ADVERTISEMENT