साईखोम मीराबाई चानू, वय वर्ष २६ राहणार मणिपूर, इम्फाळ. टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टींग प्रकारात मीराबाईने धडाकेबाज कामगिरी करत भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिली. स्नॅच आणि क्लिन अँड जर्क प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत मीराबाईने ४८ किलो वजनी गटात पहिलं पदक मिळवलं. मीराबाईने या स्पर्धेत तब्बल २०२ किलो वजन उचललं. सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टींग प्रकारात पदकाची कमाई केलेल्या कर्नम मल्लेश्वरीनंतर मीराबाईने पहिल्यांदाच भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं आहे.
ADVERTISEMENT
ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासीक पदकाची कमाई केल्यानंतर मीराबाई चानूवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतू मणिपूरसारख्या इशान्येकडील राज्यातून येऊन ऑलिम्पिक पातळीवर पदकाची कमाई करण्याचा मीराबाईचा प्रवास हा सोपा नव्हता. लहानपणी आपल्या घरच्यांसोबत लाकडं गोळा करायला जाणारी मीराबाई १२ व्या वर्षात लाकडांची मोळी सहज उचलायची. त्यावेळी मीराबाईच्या भावाला तिच्यात असलेल्या ताकदीची जाणीव झाली. यानंतर घरच्यांच्या मदतीच्या जोरावर मीराबाईने वेटलिफ्टींग प्रकारात खेळायला सुरुवात केली.
आजही मीराबाई टोकियोमध्ये पदकासाठी झुंज देत असताना मीराबाईचा परिवार आणि तिचे शेजारी घरात बसून टिव्हीवर तिचा सामना पाहत प्रोत्साहन देत होते.
२०१४ साली ग्लास्गो येथे झालेल्या कॉमनवेल्थ प्रकारात मीराबाईने ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. यानंतर २०१८ साली ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही मीराबाईने आपला राष्ट्रीय विक्रम मोडत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याआधी २०१७ साली वर्ल्ड वेडलिफ्टींग चँपिअनशीपमध्ये मीराबाई चानूने सुवर्णपदक मिळवलं होतं.
Tokyo Olympic 2020 : मीराबाई चानूने उघडलं पदकांचं खातं, वेटलिफ्टींग प्रकारात रौप्य पदकाची कमाई
तिच्या याच कामगिरीमुळे भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकांची आशा होती. वेटलिफ्टींग प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा पहिला मान मीराबाईनेच पटकावला होता. २०१६ साली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई सहभागी झाली होती. परंतू क्लिन अँड जर्क प्रकारात वजन उचलण्यात तिला अपयश आलं होतं. परंतू या सर्वांची कसर भरुन काढत मीराबाईने अमेरिकेत जाऊन विशेष सरावावर भर दिला होता. अमेरिकेतल्या सरावानंतर ती थेट टोकियोत दाखल झाली. त्यामुळे या मेहनतीचं फळ तिला मिळालं असं म्हणायला काहीच हरकत नाही.
ADVERTISEMENT