भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. शिवाजी पार्कवर लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना बोलून दाखवली जात आहे. लतादीदी आयुष्यभरासाठी अविवाहीत राहिल्या. वडीलांच्या निधनानंतर घर आणि आपल्या भावंडांची जबाबदारी लतादीदींनी फार कमी वयात आपल्या खांद्यावर घेतली आणि आयुष्यभरासाठी निभावलीही.
ADVERTISEMENT
लतादीदींनी लग्न का केलं नाही याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्यांनी लग्न न करण्यामागचं कारण होतं, राजसिंग डुंगरपूर. राजघराण्यात जन्माला आलेल्या राजसिंग डुंगरपूर यांच्यावर लतादीदींचं प्रेम होतं, परंतू राजघराण्याची प्रतिष्ठा आड आल्यामुळे राजसिंग आणि लतादीदींचं लग्न होऊ शकलं नाही. परंतू दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम पाहता, त्यांनी आयुष्यभर एकटं राहण्याचा निर्णय घेतला.
अर्ध्यावरती डाव मोडला…’या’ कारणामुळे लतादीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहीत
लतादीदींच्या निधनानंतर राजसिंग डुंगरपूर हे नेमके कोण होते याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांच्यासाठी ही थोडक्यात माहिती….
राजस्थानमधील डुंगरपूर येथे १९ डिसेंबर १९३५ मध्ये राजसिंग यांचा जन्म झाला. राजसिंग हे डुंगरपूरचे महाराजा लक्ष्मण सिंह यांचे सर्वात धाकटे चिरंजीव होते. त्यांना जयसिंह आणि महिपाल असे दोन भाऊही होते. याव्यतिरीक्त राजसिंग यांना तीन बहिणी होत्या. लतादीदींसोबत राजसिंग यांच्या नात्याव्यतिरीक्त एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख होती.
राजसिंग यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मध्य भारताचं नेतृत्व केलं होतं. ८६ सामन्यांमध्ये १२९२ धावा राजसिंह यांच्या नावावर जमा आहेत. फलंदाजीत राजसिंग फारसे चमक दाखवू शकले नसले तरीही गोलंदाजी हा त्यांचा हुकुमी एक्का होता. आपल्या स्थानिक क्रिकेटच्या कारकिर्दीत राजसिंग यांनी २०६ विकेट घेतल्या होत्या. ८८ धावा देऊन ७ विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते.
अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाशी लतादीदींचं होतं खास नातं, स्वतः पोळ्या लाटून केली होती सेवा
स्थानिक क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीनंतर राजसिंग हे क्रिकेट प्रशासकीय कामकाजाकडे वळले. अनेक वर्ष ते बीसीसीआयमध्ये विविध पदांवर कार्यरत होते. ज्यात त्यांनी निवड समितीचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. याचसोबत १९९६ ते १९९९ या काळात राजसिंग डुंगरपूर हे बीसीसीआयचे अध्यक्षही होते.
याव्यतिरीक्त राजसिंग डुंगरपूर यांच्यामुळेच सचिन तेंडुलकरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली होती. सचिनव्यतिरीक्त अनिल कुंबळे, मोहम्मद अझरुद्दीन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द घडवण्यात डुंगरपूर यांचा मोलाचा वाटा होता. लतादीदी आणि राजसिंग यांच्या प्रेमाबद्दलचे अनेक किस्से ऐकायला मिळतात.
हृदयनाथ मंगेशकर यांच्या माध्यमातून लतादीदी आणि राजसिंग यांची ओळख झाली होती, ज्यानंतर या ओळखीचं रुपांत प्रेमात झालं. अनेकदा आपलं रेकॉर्डींग संपवून लतादीदी राजसिंग यांना भेटायला जायच्या. लतादीदींना क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम होतं. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी लतादीदींनी खास कार्यक्रम केला होता. परंतू राजघराण्याची प्रतिष्ठा आड आल्यामुळे लतादीदी आणि राजसिंग यांचं लग्न होऊ शकलं नाही. यानंतर दोघांनीही अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला. परंतू यानंतरही दोघांनी अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केलं होतं.
ADVERTISEMENT