बीसीसीआयने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस U-19 संघासाठी तिरंगी मालिकेची घोषणा केली आहे. या स्पर्धेत भारत अ आणि भारत ब असे दोन संघ सहभागी होणार असून बांगलादेशचा १९ वर्षाखालील संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये मिळून महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना संधी मिळाली असून यात जुन्नरचा अष्टपैलू खेळाडू कौशल तांबेलाही टीम इंडियाचं तिकीट मिळालं आहे.
ADVERTISEMENT
२८ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून सर्व सामने हे कोलकात्यात खेळवले जातील. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, केदार जाधव यांच्यानंतर टीम इंडियाचं तिकीट मिळवलेला कौशल तांबे हा पुणे जिल्ह्यातला तिसरा खेळाडू ठरला आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडीज येथे होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला आपला संघ निवडायचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीसीसीआयने बांगलादेश एकोणीस वर्षाखालील संघाविरुद्ध भारताच्या एकोणीस वर्षाखालील अ आणि ब संघांची तिरंगी मालिका खेळवण्याचे निश्चित केले आहे. विश्वचषकाआधी युएईत युवा संघाचा आशिया चषक खेळवला जाणार आहे, त्या स्पर्धेच्या दृष्टीकोनातूनही भारतीय संघासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे.
आणखी एका मित्रावर गांगुली सोपवणार महत्वाची जबाबदारी, लक्ष्मणकडे NCA चं संचालकपद जाण्याची शक्यता
१८ वर्षीय कौशल मागील दहा वर्षापासून महाराष्ट्र क्रिकेट संघाचे विविध वयोगटात प्रतिनिधित्व करत आहे. इतकेच नव्हे तर त्याने १६ वर्षाखालील पश्चिम विभागीय संघाचा कर्णधार म्हणून भूमिका निभावली होती. विनू मंकड ट्रॉफी आणि चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा आहे. कौशल हा मुळचा जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा रहिवासी आहे. त्याच्या निवडीमुळे घरच्यांसह सर्व गावाला आनंद झाला आहे.
सध्या पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या कौशलने पुण्यातील विविध क्लबमधून क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. केंड्स क्रिकेट अकादमीत तो मागील दहा वर्षापासून प्रशिक्षण घेत आहे. तसेच त्याला २०१६ मध्ये एमसीएचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते. बांगलादेशविरुद्धच्या तिरंगी मालिकेत त्याच्यासह विकी ओत्सवाल व राजवर्धन हंगारगेकर या महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड झाली आहे.
ADVERTISEMENT