भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रताप! 'लव्ह जिहाद'चा आरोप करत पोलीस स्टेशनमध्येच तरूणांना मारलं, घटना काय?
पुण्यातील या गोंधळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पुण्यातील भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड आणि त्यांचे कार्यकर्ते एका सलून चालकाला मारहाण करताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सलून चालकाला पोलीस ठाण्यातच मारहाण

भाजप पदाधिकाऱ्यांचा आणखी एक प्रताप

महिला पदाधिकाऱ्यांकडूनही मारहाण
Pune Crime : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या काही घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतोय. त्यातच आता पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी आणखी एक प्रताप केला आहे. दोन दिवसांपूर्वीच दीनानाथ रुग्णालयातील घटनेवरुन काहीही संबंध नसलेल्या डॉ. घैसास यांच्या वडिलांचं रुग्णालय फोडलं होतं. त्यानंतर आता भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी उज्ज्वला गौड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडमध्येच एका सलून चालकाला मारहाण केली.
सलूनमध्ये घुसून केला राडा
पुण्यातील या गोंधळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पुण्यातील भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड आणि त्यांचे कार्यकर्ते एका सलूनमध्ये जातात. "चला बंद करुयात म्हणतायत" म्हणत तिथे राडा करतायत. पुणे शहरातील कोथरुडमध्ये अर्श नावाच्या युनिसेक्स सलूनमध्ये हा प्रकार घडला. या सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. हा सर्व प्रकार कोथरुड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलाय.
हे ही वाचा >> बीडसारखाच पॅटर्न संभाजीनगरमध्ये, बिल्डरला किडनॅप केलं, कपडे काढून मारलं, डोक्याला बंदूक लावून...
सलून चालकावर धर्मांतराचा आरोप
"सलून चालकाने सलूनमध्ये काम करत असलेल्या युवतीला धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्तीने कलमा पढायला लावला. तसंच कुठेही वाच्यता करु नये म्हणून एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आलं" असा आरोप भाजप पदाधिकारी उज्जवला गौड यांनी केला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी या दुकानातील फ्लेक्सला काळं फासलं. त्यानंतर दुकानातील सर्व ग्राहकांना बाहेर काढलं. एवढ्यावरच न थांबता सलूनचे मालक आणि काम करणाऱ्या मुलाला कोथरुड पोलीस स्थानकाच्या संरक्षण भिंतीच्या आत घेऊन पोलिसांसमोर मारहाण केली.
पोलीस स्थानकाच्या कंपाऊंडच्या आत मारहाण
हे ही वाचा >> 'दीनानाथ' प्रकरणात वादळाच्या केंद्रस्थानी, राजीनामा देणाऱ्या डॉक्टर घैसास यांची हिस्ट्री काय?
लव्ह जिहाद आणि हिंदू तरुणीचं धर्मांतर केल्याच्या आरोपावरून भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लिम तरुणांना थेट पोलिस स्टेशनमध्येच मारहाण केली. ज्या तरूणांना मारहाण केली त्यांच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात बीएनएस कलम 351(2), 79 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस म्हणाले, असे कुठलेच पुरावे नाही
पोलाीस उपायुक्त संभाजी कदम यांनी मुंबई तक ला दिलेल्या माहितीनुसार, " कथित लव्ह जिहाद किंवा जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या दाव्यांचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे नाहीत. लेखी आणि व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड केलेल्या मुलीच्या जबाबात स्पष्टपणे म्हटलं आहे की, जबरदस्तीने लग्न किंवा धर्मांतर असं काहीही झालेलं नाही. तसंच आपल्याला कुणी कलमाही म्हणायला सांगितला नाही."