‘सुषमा अंधारेंना दोन चापटा लगावल्या’, ठाकरे गटात वादाची ठिणगी; काय घडलं?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंना बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. आप्पासाहेब जाधव यांनीच हा दावा केला आहे.
ADVERTISEMENT
Sushma Andhare News : शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रा शनिवारी (20 मे) बीडमध्ये होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सभास्थळाची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी गेले होते. यावेळी दोन जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात हाणामारी झाली. तसेच जिल्हाप्रमुखांच्या गाडीची काचही फोडण्यात आल्याचा प्रकार घडला. ही घटना गुरुवारी (18 मे) रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही. दरम्यान, रात्री उशिरा जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी आपण सुषमा अंधारेंना दोन चापटा मारल्याचा दावा केला. जाधव यांनी व्हिडीओ जारी करत हा दावा केला असून, त्यामुळे शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खळबळ उडाली.
ADVERTISEMENT
सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाची बीडमध्ये मोठी सभा होत आहे. या सभेला खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह इतर खासदार, आमदारांची उपस्थिती असणार आहे. त्याची माहिती जिल्हाप्रमुख अनिल जगताप व अप्पासाहेब जाधव यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी संपर्कप्रमुख धोंडू पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वाचा >> ‘कपडे बदलता तसे तुम्ही पक्ष बदलता?’ आमदार नितेश राणे यांना प्रश्न विचारल्यानंतर नेमकं काय झालं?
दरम्यान, सायंकाळी सुषमा अंधारे यांच्यासह जिल्हाप्रमुख जगताप व जाधव हे माने कॉम्प्लेक्स परिसरातील सभास्थळी पाहणी करत होते. याचवेळी जाधव व वरेकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि वाद विकोपाला जाऊन हाणामारी झाली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
यावेळी जाधव यांच्या काळ्या रंगाच्या गाडीची काचही फोडण्यात आली. इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भांडणे सोडविल्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.
हेही वाचा >> ‘शिल्लक सेनेच्या 8 याचिका अन् पोपट मेलाय’, देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
‘सुषमा अंधारेंना दोन चापटा लगावल्या’, जाधव काय म्हणाले?
‘सभास्थळाची पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी अंधारे देखील त्या ठिकाणी होत्या. सध्या सुषमा अंधारे जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये फर्निचर, सोफे, एसी बसविण्यासाठी पैसे मागत आहेत. माझे पण पद विकत आहेत. मी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू यावर त्यांचे लक्ष नाही. त्यामुळेच माझे आणि सुषमा अंधारे यांचा वाद झाला आणि म्हणूनच मी त्यांना दोन चापटा लगावल्या”, असा दावा आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT