Gold Price : सोन्याचे भाव अचानक इतके का वाढले? नेमकं काय घडलं?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Gold Rate Hike : भारतीयांसाठी सोनं म्हणजे जीव की प्राण... लग्नसराईपासून ते सणसमारंभांपर्यंत महिलांना सोनं मिरवायला लागतंच लागतं. भारतात सोन्याची खरेदी केवळ यासाठीच नाही तर अनेकजण गुंतवणुकीसाठीही करतात. पण, सध्याच्या सोनाच्या किंमती पाहूनच अनेकांना घाम फुटला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या भावामुळे सर्वांच्या भुवया उंचावत आहेत. हे भाव अचानक का वाढतात? यामागील कारण काय? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Gold Rate Hike Why did the price of gold suddenly rise so much What exactly the Reason)

ADVERTISEMENT

गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या दरात 11 हजार रूपयांनी वाढ झाली आहे. आज पुन्हा 72 हजार 550 रूपये प्रति ग्रॅमने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत ही किंमत कमी आहे. काल (15 एप्रिल) सोन्याचा दर 72 हजार 940 होता. यावर्षी 14 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 61,200 रूपये प्रति 10 ग्रॅम होता. तर, 21 मार्च रोजी सोन्याचा भाव 66 हजार 100 रूपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हा भाव 73 हजार रूपयांच्या जवळ पोहोचला आहे.

सोन्याच्या किंमतीत का होतेय सतत वाढ?

सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ पाहून केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक आश्चर्यचकित झाले आहेत. अशावेळी सोन्याचे भाव वाढण्याचे कारण काय हा प्रश्न उपस्थित होतो. तज्ज्ञांच्या मते, याचं एक कारण म्हणजे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका त्यांच्या रिझर्व्हमध्ये सोन्याचा साठा वाढवत आहेत. यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ चायना यांचाही समावेश आहे. 

हे वाचलं का?

तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे बदलही यासाठी कारणीभूत आहेत. केडिया कॉमेडिटीचे एमडी, याबाबत म्हणाले की, "अमेरिकेची मध्यवर्ती बँक 'फेडरल रिझर्व्ह बँके'ने सूचित केले आहे की, आगामी जून तिमाहीत अमेरिकेतील व्याजदर एक चतुर्थांश (0.25) टक्क्यांनी कमी केले जातील. याच कारणामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. याशिवाय आयात शुल्क, युद्धजन्य परिस्थिती इत्यादी कारणांमुळे देखील भाव वाढले आहेत. भारत दरवर्षी सरासरी 800 टन सोने आयात करतो. स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, दुबई इत्यादी देशांतून सोन्याची आयात केली जाते.

जगातील प्रमुख मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवते. बुलियन मार्केट आणि सराफा बाजार ही दोन ठिकाणे आहेत जिथून सोने आणि चांदीचा व्यापार होतो. सर्वसामान्य लोक सराफा बाजारातून सोने खरेदी करतात. सोन्याचे व्यापारी सराफा बाजारातून फ्यूचर मार्केटद्वारे सोने-चांदीचा व्यापार करतात. 

ADVERTISEMENT

वाढत्या किंमतीमुळे टेन्शन वाढलं असलं तरी लोक करतायेत सोनं खरेदी...

सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे अनेकांचं टेन्शन वाढलं आहे पण यामध्ये केलेल्या गुंतवणुकीला लोक सुरक्षितही मानतात. लग्नसराईचा सीझन सुरू झाला आहे आणि अशा परिस्थितीत ज्यांच्या घरी लग्न आहे, तेही मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता दुकानदारांनी व्यक्त केली आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT