Inflation : खायचे वांदे, महागाई 15 महिन्यांतील शिखरावर, कधीपर्यंत होणार कमी?
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली असून, पुढील काही महिन्यात महागाई कमी होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

Inflation Rate in India : सर्वसामान्य माणूस सध्या महागाईच्या झळा सोसताना दिसत आहे. पालेभाज्यांचे वाढलेल्या दरांमुळे किरकोळ महागाई दराने जुलैमध्ये 15 महिन्यांचा विक्रम मोडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाईचा दर 7.44 टक्क्यांवर पोहोचला आहे. जून महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई 4.87 टक्के होती. त्याच वेळी गेल्या वर्षी जुलै महिन्यात तो 6.71 टक्के होता. जुलै 2023 पूर्वी किरकोळ चलनवाढीचा दर एप्रिल 2022 मध्ये सर्वाधिक म्हणजे 7.79 टक्के होता. जुलैमध्ये ग्राहक अन्न निर्देशांक महागाई 11.51 टक्क्यांवर पोहोचली आहे. दुसरीकडे अन्न व पेय पदार्थांची महागाई 10.57 टक्क्यांवर पोहोचली आहे. जूनमध्ये भाज्यांच्या किरकोळ महागाईचा दर -0.93 टक्के होता. जुलैमध्ये वाढून 37.34 टक्क्यांवर पोहोचला.
महागाई कधी कमी होणार?
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, Acuité रेटिंग्स अँड रिसर्चचे संशोधन प्रमुख सुमन कुमार चौधरी म्हणाले, “आमच्या मते, भाजीपाला लागवड आणि काढणीचे छोटे चक्र आणि किमती कमी करण्यासाठी सरकारने उचललेली काही पावले, यामुळे भाजीपाल्यांचे दर कमी होतील. नोव्हेंबर-डिसेंबर 2023 नंतर महागाई टिकून राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांनंतर अन्नधान्य महागाई कमी होण्याची शक्यता आहे.”
वाचा >> Heart attack आणि पॅनिक अटॅकमध्ये काय आहे फरक? कोणता अधिक जीवघेणा?
रिझर्व्ह बँकेचा ताण वाढणार
किरकोळ महागाईच्या ताज्या आकडेवारीने रिझर्व्ह बँकेचा ताण वाढला आहे. सलग चार महिने नियंत्रणात राहिल्यानंतर किरकोळ महागाईने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाई दराने रिझव्र्ह बँकेने ठरवून दिलेले 2-6 टक्क्यांचे उद्दिष्ट ओलांडले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. महागाई दर उद्दिष्टापेक्षा जास्त गेल्यावर रिझर्व्ह बँकेवर रेपो दर वाढवण्यासाठी दबाव येऊ शकतो.
वाचा >> Ajit Pawar meets Sharad Pawar : “शरद पवारांना चोरडियांच्या घरी भेटलो, पण…”
घाऊक महागाई कमी झाली
मात्र, दुसरीकडे आज आलेली घाऊक महागाईची आकडेवारीमुळे दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. घाऊक महागाईच्या बाबतीत जुलै महिन्यात जनतेला दिलासा मिळाला आहे. जुलैमध्येही घाऊक किंमत निर्देशांक नकारात्मक झोनमध्ये राहिला. घाऊक महागाई दरात -1.36 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यात घाऊक महागाई दर -4.12 टक्क्यांनी कमी झाला. अन्नपदार्थांच्या वाढत्या किमतींमध्ये घाऊक महागाई निर्देशांक शून्याच्या खाली असताना हा सलग चौथा महिना आहे.