कोल्हापुरात हिंसेचा उद्रेक! शरद पवारांचं गंभीर विधान; शिंदे, फडणवीस काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad pawar, eknath shinde and devendra fadnavis reaction on kolhapur violence
Sharad pawar, eknath shinde and devendra fadnavis reaction on kolhapur violence
social share
google news

Kolhapur Violence Latest News : औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यावरून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर मंगळवारपासून कोल्हापुरात दगडफेक आणि लाठीचार्जमुळे तणावपूर्ण परिस्थिती आहे. कोल्हापूरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्य सरकारकडे अंगुली निर्देश केला आहे. “शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही”, असं पवारांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतता राखण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

ADVERTISEMENT

राज्यातील हिंसक घटनांवर शरद पवार काय म्हणाले?

औरंगाबाद येथे बोलताना शरद पवार म्हणाले, “राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही.”

हेही वाचा >> औरंगजेब ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’वरून कोल्हापुरात ठिणगी, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

“गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे?” असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Politics News in Marathi : भाजपचा 2024 साठी काय आहे ‘घर वापसी’ प्लान?

“ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही”, असं म्हणत शरद पवार यांनी निशाणा साधला आहे.

कोल्हापुरातील हिंसेवर एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?

“कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करतो. माझी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता गृहविभाग घेत आहे. गृहमंत्रीही यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातलं जाणार नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

दोषींवर कठोर कारवाईच्या सूचना -देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. “शरद पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण, महाराष्ट्रात औरंगजेबाचे उदात्तीकरण कुणीही केलं, तर साहजिकच संताप निर्माण होतो. फक्त अशा प्रकारच्या संतापात कायदा हातात घेणं योग्य नाही. त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. औरंगजेबची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाहीच. पोलीस सुद्धा कारवाई करतच आहे. त्याचवेळी जनतेने सुद्धा शांतता पाळावी, कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे”, असं सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला दिलेल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT