“हे एकदा फडणवीस यांनीच सांगावे; अमित शहा, बोला”, संजय राऊतांचा थेट सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Raut । amit Shah । Devendra Fadnavis । ED-CBI: विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध ईडी, सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया तीव्र झाल्या आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआय, ईडीकडून अटक झाली असून, माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात धाडसत्र आणि चौकशी सुरू आहे. याच प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. (MP Sanjay Raut Hits out Union Home Minister Amit Shah And Devendra Fadnavis over Ed, CBI Raids)

ADVERTISEMENT

संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. संजय राऊत यांनी थेट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना यावरून काही सवाल केले आहेत.

अमित शाहांचा पत्रकारांसोबत संवाद, राऊत म्हणाले, ‘अमित शाह, बोला’

संजय राऊत म्हणतात, “2019 पर्यंत भाजपच्या लेखी नारायण राणे भ्रष्ट व चोर होते. आज ते भाजपचे आदरणीय केंद्रीय मंत्री झाले. हेमंत बिस्वा सर्मा हे आता मोदी-शहांच्या अंतस्थ गोटातील मोहरा बनले आहेत. काँग्रेस पक्षातून ते भाजपात आले व आता मुख्यमंत्री बनले. काँग्रेस मंत्रिमंडळात असताना हेमंत बिस्वा सर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने लावले होते. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची एक पुस्तिकाच भाजपने पुराव्यासह प्रसिद्ध केली होती. आसाममधील पाणीपुरवठा खात्यात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला. Water Supply Scam म्हणून हा भ्रष्टाचार तेव्हा गाजला. हेच हेमंत बिस्वा सर्मा भाजपमध्ये जाताच त्यांची सगळी पापे भाजपने धुऊन घेतली.”

“आसामच्या ताज्या दौऱ्यात पत्रकार व अमित शहा यांच्यातील मजेशीर संवाद पहा-

पत्रकार – हेमंत बिस्वा सर्मा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचे काय झाले? हेमंत सर्मा भ्रष्टाचारी आहेत की नाही?

ADVERTISEMENT

अमित शहा – चलो भय्या… छोड दो.

ADVERTISEMENT

पत्रकार – अमितभाई, जवाब दो.

अमित शहा – असे प्रश्न विचारू नका! का विचारता?

पत्रकार – अमितभाई, उत्तर द्या.

अमित शहा – नाही… नाही. मला या प्रश्नाचे उत्तर नाही द्यायचे!

याचा अर्थ काय? भाजपात या आणि पवित्र व्हा. नाही तर तुरुंगात जा! ईडीचे काम काय? भाजपचे हे सरळ सरळ मनी लाँडरिंग आहे. आपल्याकडे काळे धन असेल तर भाजपात या. काळा पैसा पांढरा होईल व आपल्याला प्रतिष्ठा मिळेल. अशा असंख्य भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भाजपने मनी लाँडरिंग केले हे उघड आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Hasan Mushrif Case: राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफांभोवती ईडीचा फास आवळणार?

संजय राऊत : “ईडी किंवा सीबीआयची तशी हिंमत आहे काय?”

संजय राऊत पुढे म्हणतात, “शिवसेना, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशा पक्षांतील अनेक भ्रष्ट नेत्यांवर भाजपने ‘मनी लाँडरिंग’ व भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यातील बरेच लोक आज भाजपच्या गोटात आहेत. काळा पैसा घेऊन ते तेथे गेले. हा पैसा (POC) Proceed of Crime मधून मिळाला. म्हणजे मनी लाँडरिंग झाले. त्यामुळे संपूर्ण भाजपवरच त्यादृष्टीने मनी लाँडरिंगचा खटला चालवायला हवा. ईडी किंवा सीबीआयची तशी हिंमत आहे काय?”, असा सवाल राऊतांनी केंद्रीय यंत्रणांना केला आहे.

संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल

संजय राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे की,”विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले. केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे या पत्रात म्हटले. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची अटक म्हणजे भारताचे एका लोकशाही देशातून हुकूमशाही शासन पद्धतीत रूपांतर झाल्याचे सिद्ध होत आहे, असे या पत्रात सांगितले. सिसोदिया यांना अटक करताना त्यांच्या विरोधात पुरावे देण्यात आले नाहीत. तसे पुरावे अनिल देशमुख व माझ्या बाबतीतही दिले नाहीत.”

किरीट सोमय्यांना दणका, हसन मुश्रीफांना दिलासा! उच्च न्यायालयात काय घडलं?

“भाजपचे ‘एजंट’ विरोधी पक्षाच्या नेत्यांची यादी घेऊन ‘ईडी’ व राज्यांच्या आर्थिक गुन्हे शाखेत बसतात व कुणावर कारवाई करायची याचे आदेश देतात. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा तोल रोज ढळत आहे. विरोधी नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर फडणवीस यांनी टीका केली, ‘भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवणे थांबवा, कारवायाही थांबतील.’ फडणवीस यांचे हे विधान त्यांच्या प्रतिष्ठेस शोभणारे नाही. गौतम अदानी यांनी कोणत्या सरळसोट मार्गाने संपत्ती गोळा केली व त्यांच्या श्रीमंतीमागे भाजपचे कोणते बडे नेते होते? हे एकदा फडणवीस यांनीच सांगावे”, असं आव्हान राऊतांनी फडणवीसांना दिलं आहे.

“हेमंत बिस्वा सर्मा यांच्या बाबतीतला अमित शहा व पत्रकारांतील संवाद त्यांनी पुन्हा ऐकावा. लोकसभेत अदानी यांच्या घोटाळय़ासंदर्भात राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यास उत्तर देण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पळ काढला व भाजपच्या एकाही नेत्याने अद्यापि तोंड उघडले नाही.भाजपमध्ये आल्यानंतर एखाद्या नेत्याविरुद्ध सुरू असलेली तपास यंत्रणांची कारवाई थांबल्याचे एक तरी उदाहरण विरोधकांनी दाखवून द्यावे, असे आव्हान फडणवीस देतात तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळात व आपल्याच विधिमंडळात डोकावून पाहायला हवे. म्हणजे ‘मनी लाँडरिंग’च्या प्रचंड पैशांसह बरेच नेते त्यांच्या पक्षात कसे आले व विराजमान झाले ते त्यांना कळेल”, असं म्हणत राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाकडे बोट दाखवलं आहे.

“भारतीय जनता पक्षात प्रचंड प्रमाणात काळ्या पैशांची आवक आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यवहारातून म्हणजे PMLA कायद्यानुसार ‘प्रोसिड ऑफ क्राईम’मधूनच हा पैसा त्यांच्याकडे येत आहे. मनी लाँडरिंगचा व्यवहार करणारे अनेक नेते भाजपात वाजतगाजत घेतले. म्हणजे त्या ‘प्रोसिड ऑफ क्राईम’मध्ये भाजपचे हात काळे झाले हे मान्य केले तर PMLA म्हणजे मनी लाँडरिंगविरोधी कायद्यानुसार भारतीय जनता पक्षावरच कारवाई व्हायला हवी”, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

अरे देवा! ईडीची धाड पडताच तेजस्वी यादवांची गर्भवती पत्नी बेशुद्ध, काय घडलं?

विरोधकांना संजय राऊतांचा सल्ला

“सत्ताधारी भाजप हेच मनी लाँडरिंगचे खरे आगर आहे. मनी लाँडरिंगचे सर्व गुन्हेगार भाजपात येतात व लगेच त्यांच्यावरील ‘ईडी’च्या कारवाया थांबवल्या जातात, हे काय फडणवीस यांना माहीत नसावे? कोकणातील ‘साई रिसॉर्ट’प्रकरणी सदानंद कदम यांना ‘ईडी’ने ते आजारी असताना उचलले, पण आय.एन.एस. विक्रांतप्रकरणी लोकांकडून गोळा केलेला पैसा गायब करणाऱ्यांपर्यंत ‘ईडी’ पोहोचली नाही व फडणवीस गृहमंत्री होताच त्यांनी ही चौकशीच बंद करून चोर-लुटारूंना सरळ ‘क्लीन चिट’ दिली. भ्रष्टाचार दडपण्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. भाजप मनी लाँडरिंग राजरोस करीत आहे. ‘POC’ म्हणजे गुन्हेगारीतून आलेली माणसे व त्यांचा पैसा जिरवून ढेकर देत आहे. संपूर्ण भाजपवरच ‘मनी लाँडरिंग’चा खटला चालवायला हवा. विरोधी पक्षांच्या ज्या नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून भिंतीवर डोके आपटण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात उभे केले पाहिजे”, असा सल्ला संजय राऊतांनी विरोधकांना दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT