लतादीदींच्या स्मारकावरून सुरू झालेलं राजकारण थांबवा, हृदयनाथ मंगेशकर यांचं कळकळीचं आवाहन
भारतरत्न लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अवघा देश हळहळला. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी त्या ठिकाणी आली होती. लतादीदींच्या […]
ADVERTISEMENT

भारतरत्न लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अवघा देश हळहळला. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी त्या ठिकाणी आली होती.
लतादीदींच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 7 फेब्रुवारीला भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या पत्रात शिवाजी पार्क मैदानावर जिथे लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले तिथे त्यांचं स्मारक उभारावं अशी मागणी केली. काँग्रेसनेही अशीच मागणी केली. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने या मागणीला विरोध केला आहे. तर शिवसेनेने सावध भूमिका घेतली. या स्मारकावरून वाद निर्माण झाला. अशात आता लतादीदींचे धाकटे भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लतादीदींच्या स्मारकावरून सुरू झालेलं राजकारण संपवा. श्रद्धेला श्रद्धांजली वाहायची नसते असं त्यांनी राजकारण करणाऱ्या सगळ्यांनाच सांगितलं आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नेमका काय वाद सुरू झाला आहे?
काय म्हणाले आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर?
भारतरत्न लता मंगेशकर, म्हणजेच आमची दीदी. आमचीच नाही तर संपूर्ण जगाची दीदी हिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आकाशाएवढी नाही तर अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत साक्षात अनेक गंगा ओतल्या तरीही ती पोकळी भरून निघणारी नाही. लता मंगेशकरांच्या स्मारकावरून वाद सुरू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीयांना या वादात भाग घेण्याचं काहीही कारण नाही. कारण आमची ती इच्छाच नाही की दीदीचं स्मारक शिवाजी पार्क या मैदानावर व्हावं. उलट आमचं असं म्हणणं आहे की जो राजकारणी लोकांचा या स्मारकावरून वाद सुरू आहे तो वाद बंद करावा. दीदीच्या बाबतीत कृपया राजकारण करू नये.
लता मंगेशकर यांच्या स्मारकावरुन राजकीय पक्षांत मतभेद
महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापना करण्याचं दीदीला आश्वासन दिलं होतं. ती विनंती स्वतः दीदींनी म्हणजेच लता मंगेशकरांनी त्यांना केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उदय सामंत यांनी ही विनंती अत्यंत आनंदाने मान्य केली. त्याची सर्व पूर्वतयारी त्यांनी केलेली आहे. दीदीचं एक संगीत स्मारक होतं आहे. यापेक्षा अन्य कुठलंही मोठं स्मारक होऊ शकत नाही. श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते. दीदी गेल्याने एक संगीत पर्व संपलंय, नुसतं संगीत पर्व नाही तर हा युगान्त झाला आहे.