ख्यातनाम हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत कलाकार पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांचं निधन
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल..., करिता विचार सापडले वर्म..., वक्रतुंड महाकाय... यांसारखी गाजलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांचं निधन

वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

1944 मध्ये दैवज्ञ कुटुंबात झाला होता पंडित कारेकरंचा जन्म
ख्यातनाम हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत कलाकार पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांचं बुधवारी रात्री निधन झालं. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी गुरुवारी सकाळी त्यांच्या शिवाजी पार्क
येथील घरी ठेवण्यात येणार असून, सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्क, दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 1944 मध्ये दैवज्ञ कुटुंबात जन्मलेले पंडित कारेकर हे 2022 पासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. बुधवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे तीन मुलं आणि सुना-नातवंडं असा परिवार आहे. (Renowned Hindustani classical music artist Pandit Prabhakar Janardan Karekar passes away)
हे ही वाचा >> Aaditya Thackeray : पक्ष आणि परिवार फोडणाऱ्यांचं कौतुक आम्ही कधीच करणार नाही, दिल्लीतून ठाकरेंचा निशाणा
पंडित कारेकर यांचा जन्म गोव्यात झाला होता. त्यांनी गायलेली अनेक मराठी आणि हिंदी गाणी चांगलीच गाजली आहेत. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल..., करिता विचार सापडले वर्म..., वक्रतुंड महाकाय... यांसारखी गाजलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांना एक आघाडीचे कलाकार आणि एक चांगले शिक्षक म्हणून ओळखलं जात होतं. ऑल इंडिया रेडीओ आणि दूरदर्शनसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले होते. या माध्यमांवरचे ते लोकप्रिय कलाकार होते. त्यांनी ऑर्नेट कोलेमन (अमेरिका) आणि सुलतान खान यांच्याबरोबर एक फ्युजन अल्बम सुद्धा केला होता.
हे ही वाचा >>Nanded : मुख्यध्यापकाकडून गुंगीचं औषध देत अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची...
पंडित कारेकर यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण पंडित सुरेश हळदणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी. आर. व्यास यांच्याकडे झालं होतं. त्यांना तानसेन सन्मान (2014), संगीत नाटक अकादमी (2016), लता मंगेशकर पुरस्कार, गोमंत विभूषण पुरस्कार (2021) अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी कित्येक होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलं आहे. त्यांच्या नावावर अनेक गाजलेले अल्बम आहेत. त्यांनी संगीताच्या क्षेत्राशी संबंधित अनेक कार्यशाळा घेतल्या असून, अनेक देशांमध्ये होणाऱ्या परिषदांमध्ये सहभाग नोंदवला होता.