'कुणाल कामराच्या हस्ते होणार पुलाचे उद्घाटन', मनसेच्या राजू पाटलांनी थेट लावला बॅनर
Kunal Kamra: डोंबिवली-पलावा पुलाचे उद्घाटन कुणाल कामरा यांच्या हस्ते होणार असं उपाहासत्मक बॅनर लावून मनसे नेते राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT

Dombivli Palava Bridge: डोंबिवली: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या उपहासात्मक गाण्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद उभा राहिला आहे. काही दिवसांपूर्वी कुणाल कामराने शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे तयार केले होते, ज्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला होता. याप्रकरणी कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला समन्स बजावले आहे. अशातच आता कुणाल कामराच्या हस्ते डोंबिवलीमध्ये पुलाचे उद्घाटन होणार असल्याचे थेट बॅनर मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी लावले आहेत.
डोंबिवली-शिळफाटा रोड हा अत्यंत रहदारी असणारा आहे. इथे प्रचंड वाहतूक सुरू असते. मात्र, असं असून देखील येथील रस्त्यांच्या अडचणी गेले अनेक वर्ष कायम आहेत. येथे काही उड्डाण पूल हे प्रस्तावित आहेत. पण अनेक वर्षांपासून या पुलांची काम अर्धवट सोडण्यात आली आहेत. यावरूनच आता राजू पाटलांनी सरकारवर उपाहासत्मक पद्धतीने टीका केली आहे.
हे ही वाचा>> Kunal Kamra : मुंबई पोलीस 'त्या' घरी पोहोचले, कुणाल कामरा म्हणाला, "मी 10 वर्षांपासून..."
राजू पाटलांनी का लावला असा बॅनर?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी पलावा पुलाच्या कामावरुन पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. डोंबिवलीतील कोपर पुलाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने पलावा परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याबाबत राजू पाटील यांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देत पाठपुरावा केला, मात्र अद्याप या पुलाचे काम पूर्ण झाले नाही, ज्यामुळे राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा>> 'मन मैं नथुराम, हरकते...' कुणाल कामराने पुन्हा शेअर केला नवा VIDEO, शिंदेंच्या सेनेला आणखी डिवचलं
त्यासोबतच या पुलाचे आता कुणाल कामराच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची पोस्टही शेअर केली आहे. तारखांच्या आश्वासनांनी 'फुल्ल', कधी होणार दोन्ही पलावा पुल ? की, बनत होता.. बनत आहे.. बनतच राहील पलावा पूल? उत्तर द्या..' असा सवाल करत त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच धारेवर धरले आहे.
तसेच या पोस्टमध्ये त्यांनी या ब्रीजचे कुणाल कामराच्या हस्ते 31 एप्रिलला उद्घाटन होणार असल्याचेही म्हटले आहे. अर्थातच आज 1 एप्रिल असल्याने त्यांनी 'एप्रिल फूल' केल्याचेही पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. मात्र त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.