Sandhya Sonawane Beed : बीडमध्ये CID कडून 9 तास चौकशी झाली, त्या संध्या सोनवणे नेमक्या कोण? का होतेय त्यांची चौकशी?
Beed Massajog Sarpanch Santosh Deshmukh Case : दुपारी 12 च्या सुमारास पोलिसांनी संध्या सोनवणे यांची चौकशी सुरू केली. रात्री उशीरापर्यंत ही चौकशी सुरु होती. चौकशीनंतर सोनवणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली मात्र विचारलेल्या प्रश्नांबाबत त्यांनी फारशी माहिती दिली नाही. मात्र राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं जात असल्याचं त्या म्हणाल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख प्रकरणात CID कडून 10 जणांची चौकशी

CID कडून संध्या सोनवणे यांची चौकशी

कोण आहेत संध्या सोनवणे?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे. या तपासात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सीआयडीकडून या प्रकरणात अनेकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. खंडणीच्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या पत्नीची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती अध्यक्षा संध्या सोनवणे यांना देखील रविवारी पोलिसांनी चौकशीला बोलावलं. दुपारी 12 च्या सुमारास पोलिसांनी त्यांची चौकशी केली. रात्री उशीरापर्यंत ही चौकशी सुरु होती. चौकशीनंतर सोनवणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली मात्र विचारलेल्या प्रश्नांबाबत त्यांनी फारशी माहिती दिली नाही. मात्र राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं जात असल्याचं त्या म्हणाल्या. आता पुन्हा सोनवणे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे मस्साजोगच्या प्रकरणात संध्या सोनवणे यांची चौकशी का केली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे नेमक्या कोण आहेत, हेच या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून घेऊयात.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. आरोपींनी त्यांचं अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करुन त्यांचा खून केला. या सगळ्या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. विरोधकांकडून हा मुद्दा चांगलाच लावून धरण्यात आला. बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढत वाल्मिक कराडवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आता या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली असून सीआयडी मार्फत देखील तपास करण्यात येत आहे. यात राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांना देखील चौकशीला बोलावण्यात आलं. संध्या सोनवणे यांची बराचवेळ पोलिसांनी चौकशी केली.
हे ही वाचा >> Maharashtra News Live Updates : CID ने फासे टाकले, वाल्मिक कराड अडकणार का? संतोष देशमुख प्रकरणात अपडेट्स
संध्या सोनवणे या महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत की पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत संध्या सोनवणे यांनी ते लावून धरले. महाविद्यालयीन काळातच त्यांनी विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या सामाजिक संघटनेसोबत देखील काम केलं आहे. याच काळात त्यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनात देखील सहभाग घेतला.
पुढे त्यांनी सक्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. संध्या सोनवणे या कर्जत जामखेडच्या रहिवाशी आहेत. राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी त्यांनी रोहित पवारांसोबत काम केलं आहे. रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले तेव्हा संध्या सोनवणे यांनी त्यांचा जोरदार प्रचार केला होता. रोहित पवारांसाठी त्यांनी कर्जत जामखेडमध्ये खिंड लढवली होती.
सक्रीय राजकारणात येण्यासाठी संध्या यांनी जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. त्यात त्या सदस्य म्हणून देखील निवडूण आल्या. राष्ट्रवादीत फूड पडली नव्हती त्यावेळी त्यांना पुण्याची विद्यार्थी संघटनेची जबाबदारी देखील देण्यात आली होती. पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर संध्या यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या पक्षासोबत त्यांनी पुढे काम सुरु केलं. याच दरम्यान संध्या यांना राष्ट्रवादीचं युवती प्रदेशाध्यक्ष पद देखील देण्यात आलं. महायुतीत अजित पवार देखील सहभागी असल्याने या निवडणुकीत संध्या यांनी कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांचं काम केलं. या निवडणुकीत त्यांनी राम शिंदे यांच्यासाठी देखील सभा घेतल्याचं दिसून आलं.
हे ही वाचा >> 2000 Note Exchange Racket : शेंगदाने विकणारा चालवत होता 2000 ची नोट बदलण्याचं रॅकेट, नागपुरात रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसजवळ...
दरम्यान आता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात संध्या सोनवणेंची चौकशी करण्यात येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या आधी राष्ट्रवादीच्या बीडच्या शहराध्याची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची का चौकशी करत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता संध्या सोनवणे यांच्या चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.