वाल्मिक कराड म्हणालेला, 'जो आड येईल त्याला आडवा करा..' चार्जशीट जशीच्या तशी...
वाल्मिक कराड याच्या आदेशावरूनच संतोष देशमुखांची हत्या झाली. असं आता चार्जशीटमधून समोर आलं आहे. पाहा संपूर्ण चार्जशीट.
ADVERTISEMENT

योगेश काशिद, बीड: 'जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असेच होत राहिले तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल. कामाला लागा. विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल.' असा आदेशच वाल्मिक कराड याने दिला होता. ज्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं. या सगळ्या प्रकरणी आता चार्जशीट दाखल करण्यात आली असून त्या चार्जशीटची कॉपी आता मुंबई Tak च्या हाती लागली आहे.
वाचा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संपूर्ण चार्जशीट
सदर कटा प्रमाणे आरोपींनी खालील प्रमाणे गुन्हे केलेले आहेत.
> दिनांक ०८/१०/२०२४ रोजी अवादा एनर्जी प्रा. लि. चे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे हे वाल्मीक कराड यांचे सांगणे वरुन वाल्मीक कराड याच्या परळी येथील ऑफीसमध्ये जाऊन भेटले त्यावेळी विष्णु चाटे हा हजर होता. त्योवळी वाल्मीक कराड याने, "कंपनी चालु ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये दया, नाहीतर बीड जिल्हयातील अवादा कंपनीची सर्व कामे बंद करा" अशी धमकी दिली.
हे ही वाचा>> Santosh Deshmukh Murder: 'वाल्मिक कराडच्या आदेशावरूनच खून झाला', सुरेश धस प्रचंड आक्रमक
> दिनांक २९/११/२०२४ रोजी वाल्मीक कराड याने विष्णु चाटे याचे फोनवरुन अवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांना फोन करुन, "ज्या परिस्थतीत सुदर्शनला सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा, काम चालु कराल तर याद राखा. अशी धमकी दिली. त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले हा अवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीत गेला व "वाल्मीक अण्णांची डिमांड पुर्ण करा. आणि वाल्मीक कराडची भेट घ्या. तो पर्यंत काम चालु करु नका." अशी धमकी दिली.
दिनांक २९/११/२०२४ रोजी दुपारी वाल्मीक कराड, विष्णु चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांनी विष्णु चाटे याचे केज येथील कार्यालयात मिटींग घेवुन अवादा एनर्जी प्रा. लि. कंपनी ०२ कोटी रुपये खंडणी देत नाही त्याकरीता काय करावे लागेल याची चर्चा केली. यावेळी प्रतिक घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे हे कटामध्ये सामील झाले.
> वारंवार खंडणी मागुनही अवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीने वाल्मीक कराडला खंडणी न दिल्यामुळे, दिनांक ०६/१२/२०२४ रोजी सुदर्शन घुले, प्रतिक घुले व सुधीर सांगळे हे अवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीमध्ये गेले व तेथील सुरक्षा रक्षकास मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली. अवादा एनर्जी प्रा.लि. चे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना दोन कोटी रुपये दया नाहीतर कंपनी बंद करा. अशी धमकी देवुन शिवीगाळ व धक्काबुक्की केली. अवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी फोन करुन सरपंचला सदर घटनेबाबत सांगितले. त्यावरुन मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले व संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले व त्यांचे साथीदारांना विनंती करुन, "कंपनी बंद करु नका. लोकांना रोजगार मिळु दया असे सांगितले. " त्यावेळी सुदर्शन घुले याने सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी मागण्यात अडथळा आणला म्हणुन सरपंच संतोष देशमुख यास " सरपंच तुला बघुन घेवु, तुला जिवंत सोडणार नाही. " अशी धमकी दिली
हे ही वाचा>> 'आता 'त्यांनी' धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...' अंजली दमानिया संतापल्या
सदर घटनेनंतर विष्णु चाटे हा वारंवार सरपंच संतोष देशमुख यास कॉल करुन खंडणीचे आड येवु नको वाल्मीक अण्णा तुला जिवे सोडणार नाही अशी धमकी देत होता. याबाबत सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी अश्वीनी देशमुख, मुलगी वैभवी देशमुख व भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितले होते.
> दिनांक ०७/१२/२०२४ रोजी सुदर्शन घुले याने वाल्मीक कराड यास कॉल केला त्यावेळी वाल्मीक कराड याने सुदर्शन घुले यास सांगितले की, " जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागु असेच होत राहिले तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल. कामाला लागा. विष्णु चाटेशी बोलुन घ्या तो तुम्हाला मदत करेल. "
> दिनांक ०८/१२/२०२४ रोजी विष्णु चाटे सुदर्शन घुले व गोपनिय साक्षीदार हे नांदुर फाटयावरील हॉटेल तिरंगा येथे भेटले. त्यावेळी विष्णु चाटे याने सुदर्शन घुले यास वाल्मीक कराडचा निरोप दिला की, " संतोष देशमुख हा आडव आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पुर्ण नाही केल्या तर त्याचा काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ दया.
> दिनांक ०९/१२/२०२४ रोजी दुपारी ०३.२२ वा. चे सुमारास सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोलनाका येथे ते जात असलेली टाटा इंडिगो गाडी मांक एमएच-४४ बी-३०३२ ही अडवुन त्यांचे एमएच-४४ झेड ९३३३ व एमएच-४३ एएफ ४५०९ या गाडयातुन अपहरण केले. अपहरण करतांना आरोपींनी पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टीकचा पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर व काठीचा वापर केला. आरोपींनी संतोष देशमुख यास चिंचोली टाकळी शिव येथे घेवुन जाऊन त्यांना अमानुष मारहाण केली व त्याचा खुन केला व सायंकाळी ०६.३० वा. सुमारास त्यांचे प्रेत दैठणा फाटा येथे टाकुन आरोपी पळुन
गेले.
> गोपनिय साक्षीदार जबाब, सुदर्शन घुले व त्योच साथीदारांवर यापुर्वी दाखल असेलेले गुन्हे यावरुन सुदर्शन घुले हा संघटीत गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याने गुरनं ६३७/ २०२४ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वयेची कलमे लावण्यात आलेली आहेत.
वरील सर्व घटना हया वेळोवेळी केलेल्या कटानुसार घडलेल्या आहेत. सदर घटना या मूळ खंडणीच्या उद्देशाने घडलेल्या असुन एकाच संव्यवहाराच्या ओघात सदर आरोपींनी निरनिराळे अपराध केलेले आहेत. (offences committed in course of same transaction ) व गुरनं ६३८ / २०२४ व गुरनं ६३६ / २०२४ मधील सर्व आरोपी हे गुरनं ६३७ / २०२४ मध्ये आरोपी आहेत.
म्हणुन न्यायाच्या हिताच्या दृष्टीने तिन्ही गुन्हयाचे एकच आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे.
सदर गुन्हयातील आरोपीतांनी मिळवलेली मालमत्ता बाबत दुय्यम निबंधक कार्यालय येथुन तसेच आरटीओ ऑफीस यांचेकडुन माहिती मागविण्यात आली होती. सदर माहितीचे अवलोकन केले असता आरोपींनी टोळीच्या माध्यमातुन मोठया प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता प्राप्त केल्याचे दिसुन येते. सदर टोळीने बीड जिल्हयातील अंबाजोगाई, केज, धारुर तसेच धाराशिव जिल्हयातील कळंब या पोलीस ठाणे हद्दीत मागील १० वर्षात ११ गुन्हे केले आहेत. त्यापैकी ०८ गुन्हयांचे दोषारोप पाठविण्यात आलेले आहेत. त्या सर्व गुन्हयांची मा. न्यायालयाने दखल घेतलेली आहे. हे सर्व गुन्हे तीन वर्षे व त्यापेक्षा जास्त शिक्षेचे आहेत. सर्व गुन्हे संघटीत टोळीच्या माध्यमातुन संघटीत टोळीच्या आर्थिक फायदयासाठी, टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी, तसेच जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी, संघटीतरित्या व एकटयाने व वेगवेगळया साथीदाराच्या मदतीने केलेली आहेत. सदर टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले हा आहे.