'बीडचे कशाला प्रश्न विचारता.. पुण्याचे पत्रकार आहात तुम्ही', पंकजा मुंडे चिडल्या
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या चार्जशीटवरून मंत्री पंकजा मुंडे यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्या संतापल्याचे दिसून आले.
ADVERTISEMENT

पुणे: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं चार्जशीट आज (1 मार्च) समोर आलं. ज्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वाल्मिक कराडच्या आदेशावरूनच ही हत्या झाली असल्याचे आरोप केले जात आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून मंत्री पंकजा मुंडे यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्या मात्र चिडल्याचं दिसून आलं.
पंकजा मुंडे आज या पुणे दौऱ्यावर होत्या. जिथे त्यांना पत्रकारांनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीटबाबत प्रश्न विचारले. तेव्हा त्या संतापलेल्या पाहायला मिळाल्या.
वाल्मिक कराड चार्जशीटवरून प्रश्न विचाराल्यावर पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'पुण्यात आहे मी.. आता त्या महिलेवर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये.. झाला नाही का? झाला ना.. मग ते प्रश्न विचारा ना.. मी पुण्यात आली आहे तर.. बीडचे कशाला प्रश्न विचारता.. पुण्याचे पत्रकार आहात तुम्ही.'
हे ही वाचा>> वाल्मिक कराड म्हणालेला, 'जो आड येईल त्याला आडवा करा..' चार्जशीट जशीच्या तशी...
'त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही.. अशा अनेक घटना आहेत. काल नांदेडमध्ये तर चालत्या बाइकवर मागून वार करून चाकू हल्ला करून मारलं. त्याचं सीसीटीव्ही फुटेज दाखवले मीडियाने.'
'हे प्रकार सगळीकडे चालले आहेत. संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू?'
हे ही वाचा>> 'आता 'त्यांनी' धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...' अंजली दमानिया संतापल्या
'घटना झाल्याचा दिवसापासून.. 12 डिसेंबरपासूनची माझी भाषणं काढा, त्यामध्ये 90 टक्के मी त्यावरच बोलली आहे. त्यामुळे आता त्याच्या आतल्या विषयांवर बोलण्याचं औचित्य नाही. मला त्यातील माहिती नाही. मी गृहखातं नाही.. गृहखात्यांच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणं योग्य आहे. जी माहिती द्यायची आहे ती कोर्टाला देतील.'
'त्यानंतर जे काही ठरेल.. आणि जे योग्य आहे ती कारवाई होईल. माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे. त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीममधील एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेसं नाही. संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. हे मी एक हजार एकवेळा बोलून झालेलं आहे.' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी इतर कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता तिथून निघून जाणं पसंत केलं.