Maharashtra Politics News : अजित पवारांसोबत नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, अजून खातेवाटप झालं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा अजित पवारांना अर्थखातं देण्यास विरोध असल्यामुळेच खातेवाटप रखडल्याचं म्हटलं जातंय. त्याचवेळी अजित पवारांच्या एंट्रीमुळे एकनाथ शिंदेंचे खास असलेले शंभूराज देसाईही अडचणीत आलेत. कोणत्या फॉर्म्युल्यामुळे देसाईंना सत्तेची गादी सोडावी लागेल, आणि याच फॉर्म्युल्याबद्दल देसाई काय म्हणाले?
ADVERTISEMENT
शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे खासमखास म्हणून ओळखले जातात. शिंदेंचं मूळ गाव सातारा जिल्ह्यात येतं, तर मतदारसंघ ठाण्यात येतो. या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद शिंदेंनी उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंकडे दिलंय. यावरून देसाई शिंदेंचे किती निकटवर्तीय आहेत, हे अधोरेखित होतं. पण दादांच्या एंट्रीनं याच देसाईंची गादी धोक्यात आल्याचं म्हटलं जातंय.
अजित पवारांच्या समावेशाने काय बदललं?
त्याचं झालं, असं की अजित पवारांनी 2 जुलैला ८ जणांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. पण 11 दिवस झाले, तरी सर्वजण बिनखात्याचे मंत्री आहेत. त्याचवेळी पालकमंत्रीपदावरूनही दावेप्रतिदावे केले जात आहेत. मंत्रिपदासाठी इच्छूक भरत गोगावलेंनी रायगडचा पालकमंत्री मीच होणार असं म्हणत मंत्री आदिती तटकरेंना विरोध केला. तर दुसरीकडे सातारच्या वाईचे आमदार मकरंद पाटील यांची अजितदादा गटात एंट्री झालीय.
वाचा >> Sharad Pawar : पुनरावृत्ती होणार!, दादांचा पुतण्या पवार कुटुंबाला एकत्र आणणार?
मंत्रिमंडळ विस्तारात पाटलांना कॅबिनेटही दिलं जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सातारा जिल्ह्यातीलच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाचीही मंत्रिपदासाठी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॉलिटिक्समध्ये साताऱ्याचं वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून सातारच्या पालकमंत्रीपदावरही दावा केला जाणार असल्याचं म्हटलं जातंय. याबद्दलच पत्रकारांच्या प्रश्नावर देसाईंनी उत्तरही दिलंय.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
“तो अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मी गेल्या वर्षभरापासून आहे. माझ्याकडे सातारा आणि ठाणे या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी शिंदे, फडणवीस यांनी दिलेली आहे. त्यामुळे जो निर्णय शिंदे घेतील… ज्या दिवशी आम्ही उठावाची भूमिका घेतली, त्यादिवशी मी म्हटलं होतं की, आम्ही शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे आणि तो जो निर्णय घेतील. तो निर्णय मला मान्य असेल”, असं शंभूराज देसाई म्हणाले.
वाचा >> Exclusive: अजित पवार अमोल मिटकरींना महिन्याला 50 हजार का पाठवायचे?, मुंबई Tak वर मोठा खुलासा
देसाईंनी शिंदे बांधतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण, अशी सामोपचाराची भूमिका घेतलीय. दुसरीकडे अजितदादा गटाच्या दाव्यामुळे शिंदेंना आपल्या मूळ गावाच्या पालकमंत्रीपदावर पाणी सोडावं लागू शकतं. मात्र अजितदादा गटाची ही मागणी मुख्यमंत्री म्हणून शिंदे मान्य करतात की, आपल्या विश्वासू साथीदाराचं पालकमंत्रीपद वाचवतात, हे बघणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT