मेरठ: लग्नाचं मंडप सजलं होतं, सनईचे सुर ऐकू येत होते, लग्नाची तयारी अगदी जोमात सुरू होती. एकीकडे वधूच्या घरातील कुटूंबीय वराच्या स्वागतासाठी तयारीत व्यस्त होते तर दुसरीकडे नवरा मुलगा बाशिंग बांधून लग्नस्थळावर जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यावेळीच नवरी मुलीच्या घरच्यांचा फोन आला आणि वराला धक्काच बसला. अचानक फोन आल्यानंतर ते ऐकून नवरदेवाची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्धच झाला.
ADVERTISEMENT
वधूच्या घरच्यांकडून फोन आल्यानंतर त्यांनी नवरदेवाच्या घरच्यांना सांगितलं की, वधू ब्यूटी पार्लरमधून घरी परतत असताना तिचा अपघातात मृत्यू झाला. मात्र, काही तासांनंतर नेमकं खरं काय ते समोर आलं. खरं काय ते वेगळंच होतं. नवऱ्या मुलीचा मृत्यू झाला नव्हता, तर ती ब्यूटी पार्लरमधून थेट आपल्या प्रियकरासोबत बाइकवर बसून पळून गेली होती.
मेरठ जिल्ह्यातील दौराला क्षेत्रात ही घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळी वरात येणार होती. तरुणीचं लग्न त्याच जिल्ह्यातील रोहटा क्षेत्रातील एका युवकासोबत ठरलं होतं. वधू लग्नाच्या काही तासांआधी ब्यूटी पार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी गेली होती. मेकअप करुन झाल्यानंतर, ती बाहेर उभ्या असलेल्या बाइकवर बसून आपल्या प्रियकरासोबत पळून गेली.
हे ही वाचा: 'हा' VIDEO तुम्हाला विचलित करू शकतो, मुलगी मम्मी-मम्मी ओरडत राहिली अन् Reel च्या नादात महिला थेट...
नातेवाईकांनी सांगितलं आपघाताचं कारण
वधूच्या कुटुंबीयांना मुलगी पळून गेली आहे असं कळताच मोठा धक्का बसला. गावात आणि आजूबाजूच्या परिसरात मुलीचा शोध घेण्यात आला, मात्र कोणताही सुगावा लागला नाही. वधूचा पार्लरमध्ये जाताना रस्ता अपघातात मृत्यू झाला, असे कुटुंबीयांनी वराच्या घरच्यांना खोटे सांगितले. हे ऐकताच नवरा मुलगा जागीच बेशुद्ध पडला. लग्नाच्या आनंदाऐवजी आता परिस्थिती शोकसभेसारखी झाली. पण जेव्हा वराच्या घरची मंडळी सत्य जाणून घेण्यासाठी मुलीच्या घरी पोहोचले तेव्हा खरं काय ते बाहेर आलं.
पोलीस स्टेशनमध्ये केली तक्रार
वधूच्या वडिलांनी दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल केली. तक्रारीत लिहिले आहे की, 'मी मेरठमधील दौराला येथील पाबरसा गावचा रहिवासी आहे. माझी मुलगी 14 एप्रिल रोजी लग्नासाठी दौराला येथील ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. तिथून ती पहाटे 3 वाजताच्या सुमारास बागपत जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका तरुणासह आणि त्याच्या साथीदारासह दुचाकीवरून पळून गेली. या दोन्ही व्यक्तींना दारू आणि ड्रग्जचे व्यसन आहे. माझ्या मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडेल अशी भीती मला वाटते." तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि वधूचा शोध सुरू केला आहे.
हे ही वाचा: Zaheer khan झाला बाबा, लग्नाच्या 8 वर्षानंतर सागरिका घाटगेने दिला बाळाला जन्म, नाव ठेवलं...
पोलीस घेत आहेत वधूचा शोध
दौराला पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मुलगी आणि तिच्यासोबतच्या दोन तरुणांचा शोध सुरू आहे. तसेच, पोलिसांना वर पक्षाला मुलीच्या मृत्यूबद्दल खोटं सांगण्यात आल्याबद्दल कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. असं घडलं असल्यास त्याची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
