Pune News: पुण्यात पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार (Dhirendra Shastri alias Bageshwar Dham) यांचा दरबार भरणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर तो दरबार पुण्यात आता भरलाही आहे मात्र अनेक कारणामुळे तो आता चर्चेत आला आहे. पुण्यात दिव्य दरबार (Darbar) लागल्यानंतर भाविकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यातच आता बागेश्वर बाबाच्या स्वयंसेवकांनी भाविकांना मारहाण करण्यात आल्याने हा दरबार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
ADVERTISEMENT
स्वयंसेवकांनी केली मारहाण
पुण्यात धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार भरणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यावर विरोध आणि समर्थन अशा बाजूने जोरदार टीका करण्यात आली. भाजपकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असले तरी अजित पवार गटाकडून मात्र या दरबाराला जाहिररित्या विरोध करण्यात आला होता. तर त्याच वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारावर पोलीस कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली होती. त्यातच धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारासाठी आलेल्या भाविकांना स्वयंसेवकांकडून मारहाण करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कार्यक्रमस्थळी गोंधळ
धीरेंद्र शास्त्री यांच्या स्वयंसेवकांकडून भाविकांना मारहाण करण्यात आल्यानंतर कार्यकर्मस्थळी असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत झालेला गोंधळ आवरण्यात आला. या मारहाणीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मारहाणीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल
एकीकडे धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात आलेल्या भाविकांना स्वयंसेवकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ही मारहाण होत असतानाच पोलिसांच्या मध्यस्थीमुळे भाविकांची सुटकाही करण्यात आली. मात्र दुसरीकडे या दरबारात पोलिसही गेल्यानं या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
दरबारात पोलिसही झाले नतमस्तक
धीरेंद्र शास्त्रीच्या दिव्य दरबारात पोलीस अधिकारी सहभागी झाल्यामुळे पुणे पोलिसांवर जोरदार टीका होऊ लागली आहे. पुण्यात ज्यावेळी या दरबाराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी बागेश्वरबाबासमोर पोलिस अधिकारी नतमस्तक झाले होते. कार्यक्रमस्थळी बंदोबस्तावर असतानाही पोलीस अधिकारी धीरेंद्र शास्त्री यांच्यासमोर जात त्यांनी आपली व्यथाही मांडली होती. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT