Irshalwadi landslide search operation updates : आयुष्याचा अविभाज्य भाग झालेली… ज्यांच्या सोबतीने… ज्यांच्या सहवासाने जगण्याला अर्थ मिळत होता… तिचं माणसं डोळ्यासमोर दरडीआड गेली. कुणी बाप, कुणी माय, कुणी पोटचा गोळा, तर कुणी जीवापाड जपलेली जनावरं… इर्शाळवाडीतील्या माणसांच्या दुःखाच्या टाहोने इर्शाळगडाच्या कडेकपारीचा जीवही कासावीस झाला. एकीकडे शोध कार्य सुरू होतं, तर दुसरीकडे गेल्या चार दिवसांपासून इर्शाळवाडी वाचलेली माणसं अविरत अश्रु पुसत आणि दुःखाचा आवंढा गिळत आशेने दरडीखाली दबलेल्या गेलेल्यांकडे डोळे लावून बसली होती. पण, प्रचंड ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्यांना त्यांना आता कधीही बघता येणार नाही. शेवटचं बघायची ईच्छा तर अपूर्ण राहिलीच, पण धड अंत्यसंस्कारही त्याच्या नशिबी आले नाही, इतकी क्रूर थट्टा नियतीने केली. कारण आता शोध कार्यच थांबवण्यात आलंय. (The rescue operations has been finally called off at Irshalwadi Landslide)
ADVERTISEMENT
माळीण, तळीयेनंतर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणखी एका गावाचा दरडीने घास घेतला. 19 जुलैच्या काळरात्रीने इर्शाळवाडी उद्ध्वस्त करून ठेवली. इर्शाळगडाचा मोठा कडा इर्शाळवाडी गावावर कोसळला. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या दुर्घटनेतून अनेकजण वाचले, तर अनेकांना सुरक्षित काढण्यात यश आलं. मात्र, अद्यापही 57 जणांचा थांगपत्ता लागलेला नाहीये.
शोध मोहीम थांबवली
प्रचंड पाऊस, अंधुक प्रकाश अशा वातावरणात आणि कोणत्याही मशिनरी घेऊन जाता येणार नाही अशा ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून एनडीआरएफसह वेगवेगळ्या दलाचे जवान इर्शाळवाडीत शोध कार्य करत होते. आतापर्यंत 28 जणांचे मृतदेह सापडले असून 124 लोक सुरक्षित आहेत. त्याचबरोबर घटनेत 22 जण जखमी झाले होते. त्यातील 18 जणांना उपचार करून सोडण्यात आले, तर 4 जण उपचार घेत आहेत.
Video : जवानांनी सलग 4 दिवस ही खडतर वाट पार करत केलं काम
दरम्यान, इर्शाळवाडी भागात दुर्घटना घडण्याआधीपासूनच प्रचंड पाऊस होत आहे. दुर्घटनेनंतर पावसामुळे शोध मोहिमेत अडथळे येत होते. तरीही शोधकार्य सुरूच होतं. मात्र, चार दिवस झाल्याने परिसरात आता दुर्गंधी पसरू लागली आहे. तसेच घटना घडून इतका काळ लोटला असल्याने जिवंत असण्याच्या आशाही मावळून गेल्या.
Video >> इर्शाळवाडीची झाली स्मशानभूमी… जिथं राहत होते तिथंच केलं दफन, ह्रदयद्रावक दृश्य
एनडीआरएफ, गावकरी आणि जिल्हा प्रशासनाने चर्चा करून शोध मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. खालापूर पोलीस ठाण्यात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सामंत यांनी शोध मोहीम थांबवण्यात येत असल्याचे सांगितलं.
57 जणांचा मृत्यू?
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर 57 जणांचा शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून त्यांना अजून मृत घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे ते 57 जण कोण आहेत, याची माहिती अजून समोर यायची आहे. 57 जणांना मृत घोषित केल्यास इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा दुर्दैवाने 84 वर जाईल.
झोपेत असताना आवाज झाला अन् अनेक घरं गडप झाली
19 जुलैच्या रात्री 10.30 वाजेच्या सुमारास इर्शाळवाडीवर दरड कोसळली. रात्री 11.35 वाजता जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळाली. त्यानंतर यंत्रणा घटनास्थळी रवाना झाली. रात्री 12.40 वाजता प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि मदत कार्याला सुरूवात झाली. यात सुरुवातीला अनेकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. पण, जे मोठ्या ढिगाऱ्याखाली दबले गेले, त्यांना शोधण्यात अपयश आलं.
ADVERTISEMENT