Manoj Jarange Patil Eknath Shinde : शिंदे सरकारने राज्यातील मराठा समाजाला मागासवर्ग प्रवर्गातून नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण दिले. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरून जरांगेंनी शिंदेंना आरक्षण देण्यात कोण अडथळा आणतोय, असा सवाल केला आहे.
ADVERTISEMENT
अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "काल त्यांनी बघितलं काय परिणाम झाले. काल अधिवेशनात सगेसोयरेचा विषय घ्यायला हवा होता. त्यांना राज्यभर अपेक्षित हवं होतं, ते झालं नाही. कारण लोकांचं म्हणणं ओबीसी आरक्षण आहे. १२ वाजेपर्यंत सगळे बांधव येतील आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवू", असे मनोज जरांगे म्हणाले.
निवडणुकीसाठी घेतला निर्णय- जरांगे
"राजकारण समोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्यांच्या मतांवर पुन्हा निवडणूक यायचं आणि मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करायचं. मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि त्यांनी निवडणुकीच्या काळात तुमचेच आहे म्हणायचं आणि तिकडे गेल्यावर त्यांच्याकडून बोलायचं. हे सगळं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं आहे. पण, त्यांना हे लक्षात आलं असेल की मराठा बदलला आहे", अशी टीका जरांगे यांनी केली.
"सगेसोयरेची अंमलबजावणी त्यांनी करावी. अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही. समाजाचा विश्वासघात होईल असं मुख्यमंत्र्यांनी वागू नये. पदाला दुय्यम किंमत द्यावी, पण समाजाची भावना ती ढळू देऊ नये. कारण समाजच मोठा असतो, त्यांनी मनानेच सांगावं की शपथ अपूर्ण आहे", असेही जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी नाव सांगावं -मनोज जरांगे
"वाशीतील व्यासपीठावरच आम्ही सांगितलं होतं की या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. त्यांना कुणी करू देत नसेल, तर त्यांनी स्पष्ट नाव सांगावं. नाव सांगून त्यांनी बाजूला सरकावं. इथे मला अडचणी येतात. कोण त्यांना करू देत नाही, हे त्यांनी सांगावं. किंवा तेच करत नाही, असं त्यांनी सांगावं", असं म्हणत जरांगेंनी संताप व्यक्त केला.
"मी कालच सांगितलं की ते आरक्षण टिकेल की नाही, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. शंभर-दीडशे लोकच ते घेणार आहेत. त्यात आम्हाला पडायचं नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की, आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत ओबीसीतून आरक्षण हवं. आमच्या नोंदी सापडल्या आहेत", अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
ADVERTISEMENT