– देव कोटक, नवी मुंबई : Manoj Jarange Patil Latest News : मनोज जरांगे यांचे आझाद मैदानातील उपोषण एक दिवसाने पुढे ढकलले गेले असले, तरी त्यांनी केलेल्या काही मागण्यांमुळे सरकारची मात्र झोप उडाली आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला एका रात्रीचा वेळ दिला आहे. अध्यादेश हातात मिळाला नाही, तर १२ वाजता आझाद मैदानाकडे कूच करणार, असा स्पष्ट इशारा जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांमुळे शिंदे सरकार तूर्तास तरी कोंडी सापडलं आहे.
ADVERTISEMENT
वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांनी सभा घेतली. सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाल्यानंतर ही सभा घेतली. त्यात जरांगे पाटील यांनी काही मागण्या केल्या आहेत, त्यामुळे सरकार आणखी जाळ्यात अडकलं असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
जरांगे पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
1) “सामान्य विभागाच्या सचिवांनी असे सांगितले की, ५४ लाख नव्हे तर ५७ लाख नोंदी मिळाल्या. मराठे मुंबईकडे निघाल्याच्या दणका… त्यामुळे ह्या वाढलेल्या दिसताहेत. ३७ लाख लोकांना जात प्रमाणपत्र सरकारने दिली आहेत”, असे जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा >> Maha Vikas Aghadi : रात्रीत फिरला डाव! एक कॉल अन् आंबेडकर झाले तयार
2)”सरकारने ज्यांना प्रमाणपत्र दिली आहेत, त्यांची यादी दिली आहे. मी त्यांच्याकडून यादी घेतली आहे. त्याचबरोबर मी सरकारकडे मागणी केली आहे की, “५७ लाखांपैकी किती लोकांना जात प्रमाणपत्र दिले याची, याची यादी मी मागितली आहे. शिंदे समिती रद्द करायची नाही. या समितीने काम वाढवायचं आणि नोंदी शोधायच्या. त्यांनी दोन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे, आपली मागणी आहे की, वर्षभर वाढवा. ते म्हणाले टप्प्याटप्प्याने वाढवू”, अशी माहिती जरांगेंनी दिली.
3)”ज्याची नोंद मिळाली नाही, पण त्यांच्या सग्यासोयऱ्याची मिळाली, तर त्या प्रमाणपत्राच्या आधारावर कुणबी जातप्रमाणपत्र द्यायचं. त्याचा शासन निर्णय आम्हाला पाहिजे. त्याशिवाय सोयऱ्याच्या नोंदीचा फायदा होणार नाही. सग्यासोयऱ्यासंदर्भातील अधिसूचना येणार आहे. ५४ लाख बांधवांना प्रमाणपत्र दिलेत, त्यांच्या सग्यासोयऱ्यांच्या नोंदी नाहीत. मग नोंद मिळालेल्या बांधवाने शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयरा आहे. त्याआधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं. लगेच प्रमाणपत्र द्यायचं. त्याची चौकशी नंतर करा. खोटा पाहुणा असेल, तर देऊ नका. पण, शपथपत्र शंभर रुपयाच्या बॉण्डवर घेतलं, तर पैसे जातील. त्यामुळे पेपर मोफत करा. सरकारने त्याला होकार दिला आहे.”
4) “अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे. त्यांनी सांगितलं की, गृह विभागाकडून प्रक्रियेनुसार गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण, त्यांनी आदेश दिल्याचे पत्र नाही. ते पत्र हवे. त्याची तयारी करावी. वंशावळी ज्या पुरवायच्या आहेत. त्यात काहींचे आडनाव नाहीये. त्यासाठी त्यांनी तालुका स्तरीय समित्या स्थापन केल्या आहेत”, असेही जरांगेंनी सांगितले.
5) “आपली मागणी अशी आहे की, क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. आरक्षण न्यायालयात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगेसोयऱ्याच्या निकषातून जर कुणी मराठा राहिला, तर आपण अशी मागणी केली आहे की, शंभर टक्के ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजासाठी सर्वच क्षेत्रातील शिक्षण शंभर टक्के मोफत करण्यात यावं. ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहात, त्या आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाहीत. जर तुम्हाला त्या भरत्या करायच्या असतील, तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतल्याचे सरकारने सांगितलं आहे. पण, मुलांना यातून वगळलं आहे. मोफत शिक्षण करतो म्हणाले, त्यातही अर्ध्यांनाच दिलं. त्याचाही शासन निर्णय आम्हाला हवे आहेत. मोफत शिक्षणाबद्दलच्या मागणीनुसार बदल करावा आणि संध्याकाळपर्यंत शासन आदेश द्यावेत”, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
6) “शिंदे समिती कायम स्वरूपी ठेवण्याची मागणी केलीये. त्यांनी दोन महिन्यांची मुदतवाढ दिलीये. जिल्हास्तरावर वसतीगृहाची मागणी केली आहे. मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो, त्यामुळे मायबाप जीव द्यायलाही मागे पुढे बघत नाही.
हेही वाचा >> Lok Sabha 2024 : ठाकरेंना झुकतं माप! ‘मविआ’चं जागावाटप अंतिम टप्प्यात
7) “मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात. १८२३ चं गॅझेट आहे हैदराबाद संस्थानचं, ते लागू करा. सगेसोयरे या शब्दाखाली एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. कुणी राहिला, तर पुन्हा ताकदीने आंदोलन उभे करेनं. कुणाला आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही. सगेसोयऱ्याबाबत जी अधिसूचना असायला हवी, ती मात्र यात नाहीये. माझी भांगे साहेबांना विनंती आहे की, तुम्ही प्रयत्न केले. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती. आमची अशी इच्छा आहे की, आजच्या रात्रीत आम्हाला हा अध्यादेश द्यावा. त्यांनी याला जोडून एक दिलंय की, त्यांचं असं म्हणणं आहे की, सगेसोयरे शब्दाच्या व्याख्येसह अध्यादेश काढणार आहे. त्यावर सगळ्या सचिवांच्या सह्या झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तरीही माझं म्हणणं आहे की, थोडं गुंतून का ठेवलं आहे. रात्रीतून द्या. आम्ही रात्र इथेच काढतो. २६ जानेवारीचा सन्मान करून, कायद्याचा सन्मान करून आझाद मैदानाकडे जात नाही, पण, मुंबई मात्र इथून सोडत नाही.”
7) “तुम्ही जर एवढं केलं आहे तर मग तेवढा अध्यादेश द्या. एवढं सरकारने केलं तर मी सुद्धा वकील आणि अभ्यासक बांधव अभ्यास करतो. आम्ही रात्री इथे थांबतो पण, जर दिले नाही, तर मी उद्या आझाद मैदानावर जाणार. समाजाला न्याय आणि सरकारला साथ देण्यासाठी एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे. उपोषण सुरू केलं आहे. फक्त पाणी पितोय.”
8) “इथे कुणी जर आमच्या गोरगरीब मुलाला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील संपूर्ण समाज मुंबईत येईल. महाराष्ट्रातील मराठा समाजालाही सांगतोय की, आम्ही इथे आठमुठेपणा करायला आलेलो नाही. समाजाला न्याय मिळावा म्हणून इथे आलोय. जर आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. तर महाराष्ट्रातील एकाही मराठ्याने घरी न राहता, झाडून पुसून करोडोंनी मुंबईत यावं. कुणाला त्रास व्हावा म्हणून आम्ही इथे आलेलो नाहीये, आमच्या न्यायासाठी आलो आहे.”
9) “सग्यासोयऱ्यांना फायदा होईल यासाठी अध्यादेश आवश्यक आहे. सचिवांना विनंती आहे की, तुम्हाला जितक्या ताकदीने प्रयत्न करता येईल तितक्या ताकदीने करा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घ्या. आमचा सग्यासोयऱ्याचा अध्यादेश रात्री द्या. सकाळी द्या. उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत द्या. मात्र, त्यानंतर मी आझाद मैदानाकडे जाईन.”
हेही वाचा >> Manoj Jarange : आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणार नाही -जरांगे
10) “मला माहिती पाहिजे, मोफत शिक्षणाबाबतचा आणि राखीव जागा ठेवण्याबद्दलचा शासन निर्णय पाहिजे. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश पाहिजे. आपण त्यांना रात्रीचा वेळ दिला आहे. महाराष्ट्रातील अभ्यासकांनी रातोरात इथे यावं. आपण अभ्यास करू. आपल्याला मुंबईकरांना त्रास होऊ द्यायचा नाही. सगळ्यांनी मार्केटकडे यावं. आम्हाला आझाद मैदानात जाऊन काय घरं बांधायची आहेत का? आम्हाला काय दोन-दोन गुंठे जागा धरायच्या आहेत का?”, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चिमटीत पकडले आहे.
ADVERTISEMENT