Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 26 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यासाठी मोर्चाही आता लोणावळ्यापर्यंत पोहचला आहे, मात्र आता आझाद मैदान पोलिसांनी (Azad Maidan Police) त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारील आहे. ही परवानगी नाकारताना पत्राद्वारे त्यांना उत्तर दिले आहे. त्यामध्ये आझाद मैदान उपलब्ध नसल्याचे सांगत त्याची पोलिसांनी त्यांना कारणंही सांगितली आहेत.
ADVERTISEMENT
वाहतूक व्यवस्था कोलमडणार
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करू नये असं सांगत त्यांना पोलिसांकडून स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. जरांगे पाटील यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये सांगितले आहे की, मराठा आंदोलनामुळे मुंबईतील दैनंदिन वाहतूक व्यवस्थाही कोलमडणार आहे.
हे ही वाचा >> नितेश राणेंचा राऊतांवर घणाघात, ‘मुघलांच्या वंशजांना ठेचण्याचं काम…’
मैदानाची क्षमता नाही
आझाद मैदान पोलिसांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी आंदोलक प्रचंड मोठ्या संख्येने वाहनांसह मुंबईत आल्यानंतर त्याचा विपरित परिणाम मुंबईच्या दैनंदिन वाहतूक व्यवस्थेवर होऊन ती व्यवस्था कोलमडणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे 7 हजार स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्याची क्षमता 5 हजार ते 6 हजार आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच असल्याचे सांगण्यात आले आहे. तर उर्वरित मैदान क्रीडा विभागाकडे असून ते खेळासाठी राखीव मैदानात उपोषण करण्याची परवानगी नसल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पर्यायी मैदान
तर शिवाजी पार्क मैदानातही विनापरवानगी आंदोलन केल्यास तोही न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. तसेच 26 जानेवारी रोजीच्या कार्यक्रमामध्ये अडथळाही निर्माण होणार आहे. त्यामुळे न्यायालयानेही आम्हाला आंदोलनासाठी योग्य जागा कळविण्याचे निर्देश दिले असल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे शांततेत आंदोलन करण्यासाठी नवी मुंबईतील खारघरमधील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान आंदोलनासाठी योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
सरकारला निर्देश
याआधीच उच्च न्यायालयाकडूनही मराठा आंदोलकांना दिलासा देण्यात आला होता, त्यावेळी त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याची विनंती करणार्या याचिकेची गंभीर दखल घेतली आणि आंदोलकांना योग्य ती जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते, तेसच त्यावेळी आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार असल्याचेही स्पष्ट केले होते.
जागा असेल तिथे आंदोलन
मराठा आंदोलकांना मुबलक जागा असेल तेथे त्यांनी आंदोलन करावे व तशी जागा त्यांना उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले होते. कायदा सुव्यवस्था राखा, असे निर्देश राज्य सरकारला दिले होते.
तरीही तयारी सुरू
मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही आंदोलकांनी मैदानामध्ये तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यामधून आता नेमका काय तोडगा निघणार असा सवाल उपस्थित केला जातो आहे. पोलिसांच्या त्या पत्राला मराठा आंदोलक काय उत्तर देणार किंवा जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT