Sharad Pawar meets ajit pawar news : शरद पवार-अजित पवार भेटीने महाराष्ट्रातील राजकारणात नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. संपूर्ण राष्ट्रवादी भाजपसोबत घेऊन जाण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्ने सुरू आहेत. तर दुसरीकडे शरद पवारांकडून मात्र याचा इन्कार केला जात आहे. अशात राज ठाकरेंनी पुन्हा शरद पवारांकडे बोट केले आहे.
ADVERTISEMENT
उद्योजक अतुल चोरडिया यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या घरी शरद पवार-अजित पवार यांची भेट झाली. 12 ऑगस्ट रोजी झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. नव्या शक्यता या भेटीनंतर व्यक्त होऊ लागल्या आहेत. अशात राज ठाकरेंनी मोठं भाकित केलंय.
राज ठाकरे पवार काका-पुतण्या भेटीवर
मुंबईत माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “माझं ऐकत नाही तुम्ही. सांगितलं होतं ना तेव्हा? हे त्यांचंच स्वतःचं आहे ते. एक टीम त्यांनी अगोदर पाठवली. आता दुसरी जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत. हे आज नाही. 2014 पासून मिळालेले आहेत.”
वाचा >> शरद पवार-अजित पवारांची भेट भाजपसोबत जाण्यासाठी नाही, तर…; कारण आलं समोर
“तुम्हाला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर झालेल्या गोष्टी आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया याठिकाणी मिळाली. या नावावरती मिळाली हे पण कमाल आहे”, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.
राष्ट्रवादीतील बंडानंतर राज ठाकरेंनी काय केलं होतं भाष्य?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले, त्या दिवशी (2 जुलै) राज ठाकरेंनी एक ट्विट केले होते, ज्यात ते म्हणाले होते, “आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच”, असं विधान ठाकरेंनी केले होते.
वाचा >> ‘महाराष्ट्र म्हणजे गंमत जंमत नाही’; ठाकरेंचा शरद पवारांना इशारा, स्फोटक भाष्य
इतकंच नाही तर “तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल.”
“ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?”, असंही ते म्हणाले होते.
संजय राऊतांनी केला सवाल
अजित पवार माझे पुतणे आहेत. मी घरात ज्येष्ठ असल्याने त्यांनी माझी भेट घेतली, असं शरद पवार या भेटीनंतर म्हणाले होते. पण, यावरून संजय राऊतांनी पवारांनाच उलट सवाल केलाय. राऊत म्हणाले, “ही लढाई देशाची आणि राज्याची आहे. महाभारताप्रमाणे स्वकीय असो की परकीय, नात्यातला असो की परका… आम्हाला त्याच्यात भेद करता येत नाही. आमच्या विरोधी विचाराच्या हातमिळवणी करणारा आमचा नातेवाईक असू शकत नाही, तुम्ही नातीगोती-व्यवहार सांभाळायचे, मग कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात का लढायचे?”, असा प्रश्न उपस्थित करत राऊतांनी पवारांना घेरलं.
ADVERTISEMENT