Sanjay Raut : ‘रामाचा संयम बघा, जो मी नेहमी उद्धवजींमध्ये बघतो’, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी मेळाव्यात सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर घणाघात केला. (MP Sanjay Raut Speech in Shiv Sena UBT Melava At Nashik)
ADVERTISEMENT
नाशिक येथे शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनात बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “प्रभू रामाशी आपलं जुनं नातं आहे. शिवसेनेचं अत्यंत जिव्हाळ्याचं, भावनिक नातं आहे. ते फक्त एखाद्या व्यक्तीचं किंवा क्षाचं असतं असं नव्हे. शिवसेनेचे वाघ नसते, तर… शिवसेना नसती, तर काल प्रभू श्रीरामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती. शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले, धैर्य आणि शौर्य दाखवलं आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा करता आली”, असे म्हणत राऊतांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरेंनी पुण्यभूमीची निवड केली -संजय राऊत
“लोक म्हणतात शिवसेनेचा रामाशी संबंध काय? समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे… ते शिवसेनेच्या बाबतीतच सांगितलेलं आहे. ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो श्रीराम आम्हाला देतो’. तो राम आम्हाला देतो. आमचा राम बाळासाहेब ठाकरे असतील, काळाराम असेल, आमचा अयोध्येचा राम असेल. ज्या ठिकाणी हे अधिवेशन होतंय. जो राम अयोध्येतील, तोच या पंचवटीतील आहे. प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष कुठे झाला असेल, तर तो नाशिकमधील पंचवटीत झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अधिवेशनासाठी या पुण्यभूमीची निवड केली, त्याला मोठं महत्त्व आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास सांगणारे गोविंदगिरी महाराज कोण?
“किती अवघड प्रसंग रामाच्या आयुष्यात आला. राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. तितक्यात सूचना येते की, श्रीरामा राज्याभिषेक नाही. आपण आता वनवासाला चला. पुढील १४ वर्षे आपल्याला असं जीवन जगायचं आहे. आपण राजपूत्र असून, वनवासात जावं लागतंय. पण, रामाचा संयम बघा, जो मी नेहमी उद्धवजींमध्ये बघतो. सीता-लक्ष्मणासह वनवासाला जावं लागतंय म्हणून तो निराश आणि दुःखी नाहीये, हाच तो संयमी राम”, अशा भावना संजय राऊतांनी व्यक्त केल्या.
“उद्धवजी, आपली सुद्धा वेळ येईल”
“राम जोपर्यंत अयोध्येत होता, तोपर्यंत युवराज होता. पण, राम जेव्हा संघर्ष करून जंगलातून बाहेर आला तेव्हा तो भगवान राम बनला. धैर्य, हिंमत आणि संघर्ष यातून राम भगवान झाला. रामाचा सर्वत्र अपमान झाला. तो सहन केला आणि अपमान करणाऱ्याकडे कटाक्ष बघून राम पाहत राहिला. वेट अॅण्ड वॉच माझी सुद्धा वेळ येईल. आपली सुद्धा वेळ येईल. उद्धव साहेब वेट अॅण्ड वॉच”, असा इशारा राऊतांनी विरोधकांना दिला.
“शिवसेनेचा आत्मा रामकथेत आहे. शिवसेनेचा संघर्ष रामाच्या संघर्षात आहे. शिवसेनेचा आत्मा रावणाच्या पराभवात आहे. रामाने कोणत्याही राजाची सरंजमदाराची मदत घेतली नाही. रामासोबत असलेली सर्वसामान्य माणसं होती. रामाचा निर्धार असा होता की, ज्या अन्यायाविरोधात मला लढाई लढायची आहे, ती धनिकांच्या मदतीने लढायची नाहीये. ती अदाणी-अंबानींच्या मदतीने लढायची नाहीये. ती लढाई मला सामान्य शूर योद्ध्यांच्या ताकदीवर लढायची आहे. त्यामुळे राम शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे”, असे संजय राऊत उपस्थित शिवसैनिकांना म्हणाले.
हेही वाचा >> “बाळासाहेबांनी जंगलराज पेटवले असते”, मोदी-शाहांना ठाकरेंचे सवाल
“राम आला की रावण येतो. तेव्हा एकच रावण होता. आता जागोजागी रावण दिसताहेत. दिल्लीत जा रावण, महाराष्ट्रात रावण… किती रावण? पण, एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला असं वाटतं की आजचा रावण अजिंक्य आहे. तो रावणही अजिंक्य नव्हता. त्या रावणाला बालीने हरवलं होतं. त्यामुळे सध्याचा रावण अंजिक्य नाहीये”, असा घणाघात राऊतांनी केला.
ADVERTISEMENT